

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढविल्या जातील असे नेत्यांकडून सांगितले जात असले तरी, नाशिक जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला डावलून महायुतीचा घाट घातला जात असल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाला दूर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात युतीसाठी बैठकांना जोर आला आहे. याबाबत, माजी खासदार समीर भुजबळ यांनी आमदार डॉ. राहूल आहेर यांच्याशी चर्चा केल्यानंतर भुजबळ यांनी सोमवारी (दि. १०) भाजपचे जिल्हा प्रभारी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी युतीबाबत चर्चा केली. त्यामुळे आगामी काळात भुजबळ विरुध्द आमदार सुहास कांदे यांच्यातील वादंग पेटण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झाला असून नाशिकमध्ये ११ नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करायला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. त्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित निवडणूका लढविणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून केल्या जात आहे. प्रत्यक्षात नाशिकमध्ये मात्र महायुतीत बिघाडी होत असल्याचे दिसत आहे. शिंदे गटाला लांब ठेवून नगरपालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येण्याच्या तयारीत आहे.
जिल्ह्यातील निवडणूका आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. माझी सुहास कांदे आणि समीर भुजबळ या दोघांशीही चर्चा झाली आहे. सुहास कांदे आणि भुजबळ यांचे किती प्रेमाचे संबंध आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आम्ही दोघांना सोबत घेऊन मधला मार्ग काढणार आहे. तसेच निवडणुकीतील युतीबाबत आम्ही पुन्हा भेटणार असून युतीबाबत उद्या निर्णय होईल.
गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री,
माजी खासदार भुजबळ आणि आ.डॉ. आहेर यांनी भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली होती. या बैठकीतही शिंदे गटाला दूर ठेवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी मंत्री महाजन आणि भुजबळ यांची भेट घेतली. त्यात शिंदे गटाला दूर ठेवत जिल्ह्यातील येवला, लासलगाव, नांदगाव, मनमाड या नगरपालिकांमध्ये युतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. येवला, नांदगाव राष्ट्रवादीकडे तर मनमाड भाजपकडे अशी चर्चा झाली आहे. येवल्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद नाही. नांदगाव, मनमाडमध्ये ते आमचे विरोधक आहेत. त्यामुळे त्यांना सोबत घेण्यात उपयोग नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर भुजबळांनी टिका केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. यात युतीबाबत विविध विषयांवर चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे.
समीर भुजबळ, माजी खासदार