

नाशिक : भाजपचे संकटमोचक समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे गणेश गिते यांच्या पक्ष प्रवेशासाठी धावून आले आहेत. प्रवेशाला विरोध करणाऱ्यांना महाजन यांनी कानपिचक्या देत गिते यांचा मार्ग सुकर केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला आ. सीमा हिरे यांचा विरोध कायम असून, त्यांचा प्रवेश रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कनेक्शन वापरले जात असल्याची चर्चा आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 'शंभर प्लस'चा नारा दिला आहे. महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी भाजपतर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक विजयाचे दावेदार ठरणाऱ्या अन्य पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना भाजपात आणण्याचा धडाका सुरू आहे. या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी भाजप नेत्यांनी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, बडगुजर यांच्या प्रवेशाला आ. सीमा हिरे यांचा विरोध कायम आहे. हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत आपल्या नाराजीचे प्रदर्शन केले आहे. इतकेच नव्हे तर बडगुजरांचा प्रवेश रोखण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कनेक्शन वापरले जात असल्याचीही चर्चा आहे. गिते यांच्या प्रवेशासाठी मात्र महाजन स्वत: मैदानात उतरले आहेत.
गिते यांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्यांना मंत्री महाजन यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. गिते यांना मोठे पद दिले जाणार नाही, तुमच्यावरती अन्याय होणार नाही, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनामधून महापालिकेची सत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवायची असल्यामुळे आपल्याला प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, पक्षाची शिस्त बिघडेल, अशी कृती करू नका, अशा सूचना महाजन यांनी दिल्या आहेत.