

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्याकडे संपूर्ण जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे, तर जिल्हाध्यक्ष असलेले कोंडाजीमामा आव्हाड यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नव्या नियुक्त्या घोषित केल्या. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी पाटील यांची नियुक्ती झाली. पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. जिल्ह्यातील सर्व सहाही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत गेले. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्याकडून उमेदवारी देण्यात आली होती. हे सर्व सहा आमदार विजयी झाले. शिवाय इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघही हिरामण खोसकर यांच्या रूपाने त्यांच्याकडे ओढला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यात पाच उमेदवार दिले होते. या सर्व उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय विस्तार केला जाणार होता. त्याचाच भाग म्हणून संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या. पुत्रशोकानंतर कोंडाजीमामा आव्हाड यांनी पदमुक्त करण्याची मागणी पक्षाकडे केली होती. त्यानुसार त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी जनआंदोलन उभारणार आहे. जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार. नव्या चेहऱ्यांना पक्षात स्थान दिले जाणार असून युवकांना पक्षाच्या प्रवाहात आणणार आहे.
दत्तात्रय पाटील (नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट)