Nashik Politics | उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान फोटोवरून वाद

दालनातील फोटो तातडीने हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे
Nashik Politics
Nashik Politics
Published on
Updated on

मालेगाव : महानगरपालिकेत महापौर व उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने शहराच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. संबंधित फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी तीव्र निषेध नोंदवित हा फोटो काढण्याची मागणी केली.

संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींच्या दालनात महापुरुषांचेच छायाचित्र असावे, असा शासकीय संकेत असताना उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने शहरवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप शिवसेनेने केला. मालेगाव अतिसंवेदनशील शहर असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही शिवसेनेचे म्हणणे आहे. या निषेधाच्या अनुषंगाने शिवसेनेचे नगरसेवक आयुक्त कार्यालयात दाखल झाले. जोपर्यंत फोटो काढण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. मालेगाव शहर हे अतिसंवेदनशील असल्याने शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी उपमहापौरांच्या दालनातील फोटो तातडीने हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस, मालेगाव मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांना देण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे गटनेते नीलेश आहेर यांनी पत्रकारांना सांगितले की, या प्रकरणावर मनपा आयुक्त तसेच माजी आमदार आसिफ शेख यांच्याशी चर्चा झाली आहे. शनिवार दुपारपर्यंत या वादावर पडदा टाकण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त व शेख यांनी दिल्याचे आहेर यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, महानगरप्रमुख विनोद वाघ, प्रकाश पवार, संजय घोडके, नीलेश आहेर, उमेश चौधरी, नीलेश काकडे, विशाल पवार, नितीन झाल्टे, नरेंद्र सोनवणे, दिनेश ठाकरे, लता घोडके, मीना आहेर, आशा आहेर, राजश्री पाटील, प्राची पवार, अंजना दाभाडे, जिजाबाई पवार, पूनम आहेर, हर्षिता लाडके, जान्हवी कासवे, आम्रपाली बच्छाव उपस्थित होते.

टिपू सुलतान स्वातंत्र्यसैनिक

या प्रकरणावर उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपली भूमिका मांडली. टिपू सुलतान हे इंग्रजांविरोधात लढणारे स्वातंत्र्यसैनिक होते. भाजपच्या एका खासदारांनीही ही बाब मान्य केली आहे. शासनाच्या राजपत्रात टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या छायाचित्राला विरोध करण्यामागचे कारण काय असा सवाल उपमहापौर शान-ए-हिंद यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news