

नाशिक : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यातील तीन जणांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री दादा भुसे यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपही रेसमध्ये आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावरून तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. सत्तेमधील तिन्ही पक्षांनी यंदा भाकरी फिरवत 20 नवीन चेहर्यांना संधी दिली आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तर महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र असलेल्या नाशिक जिल्ह्याला विस्तारात तीन कॅबिनेट मंत्रिपदे लाभली आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी निवड झाली आहे, तर राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ व माणिकराव कोकाटे यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्या तुलनेत राज्यामध्ये महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिका बजावणार्या भाजपची जिल्ह्यात मंत्रिपदाची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असताना, आता पालकमंत्री कोण यावरून सस्पेन्स वाढला आहे.
गेल्या महिन्यात विधानसभेचे निकाल घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची नावे चर्चेत होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना स्थान मिळू शकले नाही. त्याच वेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही नवनिर्वाचित मंत्र्यांना सभागृहाचा अनुभव असला, तरी पहिल्यांदाच त्यांना मंत्रिपदाची संधी लाभली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काहीशी पिछाडीवर पडली आहे, तर दुसरीकडे शिवसेना मंत्री भुसे यांच्यासाठी आग्रही असली, तरी मंत्री महाजन यांच्या रूपाने जिल्ह्यावरील पकड कायम ठेवण्यास भाजप उत्सुक आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सन 2026-27 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच नूतन पालकमंत्री पदाला सिंहस्थाची किनार लाभली आहे. ही सुवर्ण संधी आपल्याला लाभावी यासाठी महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांकडून जोर लावला जाऊ शकतो.