

नाशिक : एकीकडे भाजपत प्रवेशासाठी रांगा लागल्या असताना दुसरीकडे या पक्षात भविष्यात संधी नसल्याचे कारण देत दोन माजी नगरसेविकांसह आठ पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे.
राजीनामे देणाऱ्यांमध्ये माजी नगरसेविका उज्ज्वला हिरे, सविता गायकवाड तसेच जुने नाशिक मंडलाच्या सरचिटणीस राजश्री शिंदे, उपाध्यक्षा नयना बच्छाव, अल्पसंख्याक मोर्चाच्या शहराध्यक्ष हिना शेख, सदस्य लीना कटारे, अलका मंडलिक, रोजमीन पठाण यांचा समावेश आहे. हे कार्यकर्ते भाजपमध्ये सतरा वर्षांपासून कार्यरत होते. भाजप महिला मोर्चा सरचिटणीस, अल्पसंख्यांक महिला मोर्चा सरचिटणीस, अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष या पदांवर काम करत होते. मात्र भविष्यात पुढे जाण्याची संधी दिसत नसल्याने आम्ही सर्व सहकारी एकत्रित राजीनामे देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा धक्का मानला जात आहे.