

नाशिक : स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. गुरुवारी (दि. ३) जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होणाऱ्या भाजपच्या मेळाव्यात गिते यांची घरवापसी केली जाणार आहे. गिते यांच्यासोबत माजी नगरसेवक कमलेश बोडके हेही भाजपमध्ये परतणार आहेत.
महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिते यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांचे समर्थन करणाऱ्या बोडके यांनाही पक्षातून हद्दपार करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत गिते यांना पराभव पत्करावा लागला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता गिते यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेशाचे वेध लागले आहेत. १७ जून रोजी सुधाकर बडगुजर यांच्यासोबत त्यांचा प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र त्यावेळी गिते यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता. अखेर गिते यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. या मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे. या वृत्तास भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दुजोरा दिला आहे. मात्र मेळावा कुठे होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.