

नाशिक : मंत्रिपदाची नुकतीच शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवले आहे. तसेच, अन्य एका घडामोडीत इतर मागास बहुजण कल्याण, दुग्धविकास, व अपारंपरिक ऊर्जा यासह आता ‘दिव्यांग कल्याण’ या खात्याची जबाबदारी मंत्री अतुल सावे यांच्याकडे देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यापासून अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यापासून या खात्याचा भार भुजबळ यांच्याकडे पुन्हा देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी याबाबत शासकीय आदेश जारी केला आहे.