

नाशिकरोड : पक्षाला मजबूत करण्यासाठी आता प्रत्येक शिवसैनिकाने जोमाने कामाला लागले पाहिजे. नाशिक मनपा निवडणुकीत शिवसेनेचा महापौर व्हावा, यासाठी एकसंघ प्रयत्न करण्याचे आवाहन शिवसेना (उबाठा) खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत समाज मंदिर डावखरवाडी (प्रभाग २०) आणि जैन भवन (प्रभाग २१) येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन बैठक झाली. यात खा. वाजे यांच्यासह उपनेते सुनील बागूल, नवनियुक्त उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, कोअर कमिटी सदस्य केशव पोरजे, भारती ताजनपुरे, उपजिल्हाप्रमुख अस्लम मणियार, जिल्हा सचिव मसूद जिलानी, जयंत गाडेकर, किरण डहाळे, सुधाकर जाधव, महेश बडवे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या निवडणुका आठ वर्षांनंतर होत असून, इच्छुकांची संख्या मोठी आहे. काही कार्यकर्त्यांना थांबवावे लागेल, पण सर्वांच्या अपेक्षा योग्य रीतीने हाताळल्या जातील, असे दत्ता गायकवाड यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक प्रभागात गुन्हेगारीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून पोलिस महासंचालक आणि राष्ट्रपतींना निवेदन दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुनील बागूल, डी. जी. सुर्यवंशी यांचेही यावेळी भाषणे झाली.