

इगतपुरी (नाशिक) : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार, शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या निर्मला गावित या बुधवारी (दि. २८) शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील आनंद आश्रमात दुपारी १२ वाजता हा प्रवेश सोहळा होणार आहे. माजी आमदार गावित यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. काँग्रेसतर्फे त्यांनी दोन वेळा आमदार होण्याचा मान मिळवला. बदलत्या राजकीय घडामोडीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन बांधले होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा नवी राजकीय दिशा स्वीकारत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांतील आजी-माजी लोकप्रतिनिधीदेखील पक्षांतर करणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे गावित यांनी सांगितले.