

नाशिक : मिलिंद सजगुरे
मावळत्या सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्रातून छगन भुजबळ, दादा भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील आणि डॉ. विजयकुमार गावित हे मंत्रिगण होते. हे सर्व नव्या विधानसभेत निवडून आल्याने त्यांना मंत्रिपदाची आस असणे स्वाभाविक आहे. नाशिक जिल्ह्यातून अजित पवार गटाचे सात आणि भाजपचे पाच आमदार निवडून आल्याने हे सर्व मंत्रिपदासाठी दावेदारी करणे स्पष्ट आहे. छगन भुजबळ, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे यांनी लाल दिवा मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. शिंदे गटाकडून माजी पालकमंत्री दादा भुसे यांचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. महायुती संलग्न तिन्ही पक्षांतील इच्छुकांची संख्या लक्षात घेता त्यासाठी संख्याबळ आणि ज्येष्ठत्व हे मुद्दे निर्णायक ठरण्याची शक्यता गडद आहे.
जळगावमध्ये शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्याने गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांना ज्येष्ठत्वानुसार मंत्रिपद अपेक्षित असल्याने ते नेतृत्वाकडे फिल्डिंग लावून असल्याची माहिती आहे. अजित पवार गटाचे एकमेव आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळते का, याकडेही लक्ष लागून आहे. धुळ्याच्या शिंदखेड्यातील भाजपचे जयकुमार रावल यांना, तर नंदूरबारमधून याच पक्षाच्या डॉ. विजयकुमार गावित यांना लाल दिवा मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय, मंत्रिपदानंतर पालकमंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठीही जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीचे नेते या भाऊगर्दीत कसे संतुलन राखतात, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.