

नाशिक : डॉ. राहुल रनाळकर
उद्धव सेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांचा राज्यभर बहुचर्चित ठरलेला भारतीय जनता पक्षातील प्रवेश सोहळा अखेर पार पडला. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत या प्रवेशनाट्यातील गूढ कायम होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत काही माहीत नाही, असे प्रवेशाच्या दिवशी सकाळपर्यंत माध्यमांना सांगितले. ही वक्तव्ये म्हणजे या मुरलेल्या नेत्यांची राजकीय खेळी आहे. बडगुजर यांच्या संदर्भातील विरोधाची धार काहीअंशी कमी करण्यासाठीही त्यांची ही क्लृप्ती असावी. हल्ली लग्न मुहूर्ताला लागत नाही, तसाच हा प्रवेश सोहळाही दोन तास उशिरा पार पडला; मात्र त्यानंतर भाजपच्या दिग्गजांची या प्रवेश सोहळ्याबाबत उत्तरे देताना चांगलीच दमछाक झाली.
भाजपचे युवा कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी बडगुजर आणि दाऊद यांचे संबंध जोडणारा सलीम कुत्ता सोबतचा व्हीडिओ विधिमंडळात मांडून मोठा गौप्यस्फोट केला होता. तेव्हाही हे प्रकरण राज्यभर गाजले. बातमीच्या अंगाने विचार केला तर त्यास व्हिडिओची जोड असल्याने ते खूप व्हायरलही झाले. पण, हे प्रकरण कोणत्याही फौजदारी कलमात बसले नाही. आता नीतेश राणे यांनाही बडगुजर यांची पाठ थोपटावी लागत आहे. कारण आता बडगुजर त्यांचे सहकारी झाले आहेत. सलीम कुत्ता प्रकरण फार गंभीर असते तर भाजपने बडगुजर यांना कदापि पक्षप्रवेश दिला नसता, हे देखील आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील हवा निघून गेली आहे. होय, भाजप वॉशिंग मशिन आहे ! असे वक्तव्य नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार केला. बावनकुळे यांनी आरोप सिद्ध होत नाही, तोवर कुणी गुन्हेगार नसतो, हे सगळ्यांना नवीन असलेले विधान केले.
बडगुजर यांच्या प्रवेशाचे हे प्रकरण एवढ्यात संपेल असे दिसत नाही. विरोधक हा मुद्दा राज्यभर नेतील, असे दिसते. राष्ट्रप्रेम आणि हिंदू धर्मप्रेम हा भाजपच्या विचारसरणीचा मोठा गाभा आहे. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांना असे प्रवेश सोहळे आता नकोसे वाटू लागले आहेत. पर्यायाने नाशिक भाजप विरुद्ध कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असे चित्र दिसून येते. गिरीश महाजन यांचे खरे तर नाशिकमध्ये एकप्रकारे पुनरागमन झाले आहे. पालकमंत्री असताना त्यांचा नाशिकमध्ये वरचष्मा होता. मधल्या काळात दादा भुसे पालकमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन फार सक्रिय नव्हते. आता ते कुंभमेळा मंत्री आहेत आणि नाशिकचे पालकमंत्री ठरायचे आहेत. त्यामुळे महाजन नाशिकमध्ये कमालीचे सक्रिय झालेले दिसून येत आहेत. यात जाणवणारी एक उणीव म्हणजे नाशिक भाजपमध्ये मधल्या काळात जिल्हास्तरावर महाजन यांच्या उंचीइतके अन्य नेतृत्व विकसित होऊ शकले नाही. त्यामुळे महाजन यांचे नेतृत्व आता नाशिक भाजपच्या नेत्यांना मान्य करण्याशिवाय पर्याय दिसत नाही.
आता जेव्हा जेव्हा साधन-शुचितेचा विषय निघेल तेव्हा सुधाकर बडगुजर यांच्या निमित्ताने विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. त्याला भाजप कसा सामोरे जाईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नाशिक महापालिकेत बडगुजर यांच्यामुळे 10-12 जागा वाढतील, असे गणित मांडले जात आहे. एवढ्या क्षुल्लक जागांच्या मोहापोटी हा पक्षप्रवेश घ्यायचे कारण नव्हते, असे भाजपातील जुनेजाणते म्हणत आहेत. तथापि, निव्वळ राजकीय विचार करता महापालिका निवडणुकीत 10-12 जागा अधिकच्या असणे हे सत्तेत निर्णायक ठरते.
नाशिक महापालिकेत आगामी निवडणुकांमध्ये खरी लढत भाजप व शिंदेसेनेत होणार आहे. त्यामुळे भाजपात पक्षप्रवेशाचे वारे सुरू झाले, तीच स्थिती शिंदेसेनेच्या संदर्भात आहे. उद्धव सेनेतून नगरसेवक फोडताना शिवसेनाही मागे नाही. शिवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हे बाजू सांभाळून आहेत. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदे सेनेतही स्थानिक नेत्यांचे प्रवेश झाले आहेत. उद्धवसेनेतील शिल्लक माजी नगरसेवकही भाजप किंवा शिंदेसेनेत गेलेले दिसतील. महायुतीचा विचार करता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यात पिछाडीवर पडलेली दिसते. दिग्गज नेते, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ या सगळ्यात काय भूमिका घेतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.