

नाशिक : राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, या केलेल्या वक्तव्यांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे बोलत असल्या तरी एका समाजावर पक्ष काढता येत नाही. मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्याचा अर्थ त्या लगेच पक्ष काढतील, असे वाटत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री मुंडे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर एक वेगळा पक्ष वेगळा उभा राहील. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये वेगळा पक्ष उभा करण्याची ताकद आणि तितकी संख्या आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्यावर प्रेम करणारे, हे सर्व लोक केवळ गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून माझ्याशी जोडले गेलेले नाहीत. लोक गुणांचा वारसा स्वीकारतात, गुणांवर प्रेम करतात. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष उभा आहे. भाजपच्या जन्मापासून गोपीनाथ मुंडे यांनी काम करून राज्यात हा पक्ष उभा केला आहे, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, पंकजा मुंडे बोलत असल्या तरी एका समाजावर पक्ष काढता येत नाही. मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्याचा अर्थ त्या लगेच पक्ष काढतील, असे वाटत नसल्याचे भुजबळ म्हणाले. दरम्यान, सुरेश धस यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, संतोष देशमुख किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात एकच न्याय असावा. तो दलित समाजाचा आहे म्हणून वेगळा न्याय असे का? असा सवाल यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला. सर्वांना एकच न्याय असावा, यापुढेही अशीच मागणी कोणी करणार मग ते चालणार का? माणुसकी तरी असली पाहिजे, असेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
भुजबळ म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री असताना गोपिनाथ मुंडे एक दिवस ते माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी मला, आपण एक वेगळा पक्ष काढू. तुम्ही, मी, आठवले आणि गणपत देशमुख एकत्र येऊ असे म्हटले होते. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री होतो तर मुंडे दिल्लीत उपनेते होते. तेव्हा आपल्याला पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मी तयार आहे, मी ओबीसीच्या मुद्यांवर शिवसेनेतून बाहेर पडलो, असे त्यांना मी सांगितले. पण पुढे काही झाले नाही असे भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक पालकमंत्रिपदावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, आम्ही मागील कुंभमेळ्याच्या नियोजन बैठक घेतल्या होत्या. नाशिकमध्ये रिंगरोड तयार केले होते. नाशिकमधील घाट वाढवले होते. मंदिराची डागडुजी केली होती. नाशिकला विमानतळ तयार केले. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. कुंभमेळा येतोय यासाठी भारत सरकारकडे निधी मागा, असे मी त्यांना म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार आहेत. सर्व मंडळी अनुभवी आहेत. पालकमंत्रिपदाचा तिढा मुख्यमंत्री सोडवतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.