

सिडको (नाशिक) : वंचित बहुजन आघाडीला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि पक्ष निरीक्षक पिंकी शेख यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत २०० हून अधिक आजी-माजी पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी पदांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे व भारिप बहुजन महासंघाचे महानगरप्रमुख डॉ. अनिल आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या राजीनाम्यांमुळे जिल्हा संघटनेत भूकंपसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षात पैसे देईल, त्यालाच पद मिळत असल्याचा आरोप करण्यात आला.
अंबड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली की, गेल्या काही महिन्यांपासून संघटनात्मक अनागोंदी, गटबाजी, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव तसेच स्थानिक कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्षामुळे अनेक पदाधिकारी नाराज होते. या तक्रारींकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे नाराज गटाने पक्षाला एकत्रितपणे सोडचिठ्ठी दिली. राजीनामा देणाऱ्यांतील संजय साबळे व डॉ. अनिल आठवले, उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे, जितेश शार्दूल, माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव, सिडको विभागप्रमुख विवेक तांबे, शहर महासचिव संदीप काकळीज, सचिव किशोर महिरे, दिलीप लिंगायत, कल्याण खरात यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शेकडो कार्यकर्त्यांनीही राजीनामा पत्र सादर केली. नाराज पदाधिकाऱ्यांनी नेतृत्वावर गंभीर आरोप करत सांगितले की, पक्षाच्या नावाखाली काही निवडक मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी संघटनेचा वापर करतात. सामान्य कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असून, पक्षातून बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या जातात. आम्ही विचारसरणीशी निष्ठावंत असलो, तरी अशा अन्यायकारक वातावरणात काम करणे शक्य नाही. महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका दारात असताना राजीनाम्यांमुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, नाराज पदाधिकारी पुढील भूमिका रविवारी जाहीर करणार आहेत.
आनंद आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेना स्थापन केली आहे. नाशिकमध्ये त्यांनी पदाधिकारी जाहीर केले आहेत. येत्या रविवारी नाशिकमध्ये राजीनामे देणारे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटासमवेत रिपब्लिकन सेनाही असल्याने आगामी मनपा निवडणुकीत फायदा होणार आहे.