

Nashik Spa Center Raid
नाशिक : मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार चालविणाऱ्या कुंटुनखाण्यावर पोलिसांनी छापा टाकत गुरूवारी (दि.२१) पाच पीडितांची सुटका केली. या पाचही पीडित मुली इतर राज्यातील असून, संशयित आरोपी महिलेने त्यांना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करण्यास भाग पाडल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात छुप्या पद्धतीने सर्रासपणे कुंटनखाने सुरू आहेत. विशेषत: मसाज पार्लरच्या नावे हे सर्व प्रकार सुरू असून, पोलिसांकडून अशा मसाज पार्लरवर छापा टाकण्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश दिले आहेत. त्याअनुंषगाने गुरुवारी (दि.२१) मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी व अंमलदार वेश्या व्यवसाय करणाऱ्या पार्लर चालकांचा शोध घेत असताना, मुंबईनाका हद्दीत ‘आरंभ स्पा’ या नावाने सुरू असलेल्या मसाज पार्लरमध्ये बाहेरील राज्यातून महिला व मुलींना आणून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली.
त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, पीसीबीएमओबी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरष्ठि पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल व छापा पथकाने मेट्रोझोन समोरील कमर्शियल गाळ्यात सुरू असलेल्या ‘आरंभ स्पा’ याठकिणी छापा टाकला. याठिकाणी मसाज पार्लरच्या नावे वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले. यावेळी देहव्यापार चालविणारी संशयित खुशबु परेश सुराणा या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तसेच पाच पीडित मुलींची सुटका देखील केली. पीडित मुलींना संशयित आरोपी महिलेने स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्यास भाग पाडल्याचे पोलिस तपासात समोर आले. सदर संशयित महिलेविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित महिला खुशबू परेश सुराणा हिच्यविरुद्ध या अगोदर देखील पिटा व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी सुटका केलेल्या सर्व पीडित मुली या परराज्यातील असल्याचे समोर आले आहे. संशयित महिलेने या मुलींना कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम या राज्यातून आणल्याचे समोर आले. यात नाशिकमधील देखील एका महिलेचा समावेश आहे.