Nashik | तक्रारदाराला मदत करण्याऐवजी मारहाण केल्याने पोलिस अंमलदार निलंबित

भद्रकाली पोलिस ठाण्यातील अंमलदारावर कारवाई
Maharashtra police news
तक्रारदाराला मदत करण्याऐवजी मारहाण केल्याने पोलिस अंमलदार निलंबितfile photo
Published on
Updated on

नाशिक : बॅग चोरी झाल्याची तक्रार करणाऱ्या नागरिकास मदत करण्याएेवजी त्यास मारहाण करणाऱ्या भद्रकाली पोलिस ठाण्यातील अंमलदारास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबीत केले आहे. पोलिस हवालदार योगेश जालिंदर ढमाले असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराने पोलिस आयुक्तालयात तक्रार केल्यानंतर त्याची शहानिशा करून ढमाले विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूर येथील रहिवाशी संतोष बालाजी गंजी (५३) हे धार्मिक विधीसाठी नाशिकमध्ये आले होते. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शालीमार येथे त्यांची बॅग चोरी झाली. त्यावेळी ठाणे अंमलदार योगेश ढमाले हे कर्तव्यावर होते. संतोष यांनी त्यांची बॅग चोरी झाल्याची तक्रार ढमाले यांना दिली. त्यावेळी तुम्ही 'पुन्हा शालिमार येथे थांबा. पोलिस येतील, तपासणी करतील' असे ढमाले यांनी सांगितले. मात्र, दोन तास उलटूनही पोलिस न आल्याने संतोष पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी ढमाले हे पोलिस ठाण्याबाहेर झाडाखाली उभे होते. कोणीही न आल्याचे तक्रारदाराने सांगताच 'तुझी बॅग सापडणार नाही', असे म्हणत ढमाले यांनी संतोष यांना मारहाण केली. त्यामुळे संतोष यांनी पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष गाठत ढमाले विरोधात तक्रार दिली.

भद्रकाली पोलिसांना संतोष यांची तक्रार नोंदविण्याची सूचना करण्यात आली. तक्रारदार पुन्हा पोलिस ठाण्यात गेले, मात्र सीसीटीव्ही तपासणीचे कारण देत पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास विलंब केला. त्यामुळे त्रस्त झालेल्या संतोष यांनी 'तक्रार द्यायची नाही'असे सांगून निघून गेले. ३० सप्टेंबरला संतोष यांनी पंचवटीत धार्मिक विधी पूर्ण करुन पुन्हा पोलिस आयुक्तालयात गेले. त्यांनी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारीचे तथ्य पडताळून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना हा विषय सांगितला. अंमलदार ढमाले याने शिस्त पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी तातडीने त्याच्या निलंबनाचे आदेश काढले.

तक्रारीची दखल न घेणाऱ्यांना दणका

शहरात मोबाइल, वाहन, बॅग चोरी झाल्यानंतर तक्रारदारांच्या तक्रारीची दखल तातडीने घेतली जात नसल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून आहे. संबंधित वस्तू सापडल्यास ती तातडीने तक्रारदारास मिळावी यासाठी तक्रार दाखल करत नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जातो. मात्र अनेकदा वस्तू सापडल्यानंतर गुन्हा दाखल केला जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. तक्रारदारांना समजावून सांगण्याऐवजी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत माघारी पाठविले जाते. हाच प्रकार भद्रकाली पोलिस ठाण्यातही घडल्याचे उघड झाले. त्यामुळे निलंबनाच्या कारवाईमुळे तक्रार दाखल करून घेणास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना पोलिस आयुक्तांनी इशारा दिल्याची चर्चा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news