

नाशिक : शहर पोलिस दलातील शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासकीय कारणांमुळे, तसेच कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रम आणि रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत वाहतूक शाखेतील ९ कर्मचाऱ्यांची पोलिस ठाण्यांमध्ये बदली झाली आहे. तसेच, ६७ कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्याही करण्यात आल्या आहेत.
शहर पोलिस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर पोलिस ठाणेनिहाय व परिमंडळ निहाय बदल्या होत आहेत. त्यासाठी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या तसेच बदल्यांसाठी पसंती क्रम मागवला होता. त्यानंतर संबंधित पोलिस ठाणे, शाखांमधील रिक्त पदे आणि संख्याबळ लक्षात घेत या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहर वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक रामदास शिंदे यांची पंचवटीत, अमोल पंढरीनाथ आहिरे यांची इंदिरानगर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. तर पोलिस हवालदार अरुण पाटील, रवींद्र काकडे, पांडुरंग आहेर, अनिल शेलार, मुकेश इंगवले यांची अनुक्रमे सातपूर, उपनगर, मुंबईनाका, देवळाली कॅम्प आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात बदली केली आहे. तसेच पोलिस शिपाई हरीश महाले व संतोष पाटील यांची आडगाव आणि पंचवटी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ६७ पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. यातून पाेलिस आयुक्तालयातील रिक्त जागा जवळपास भरण्यात आल्या आहेत.
राज्यस्तरीय पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केले होते. त्यानुसार निकष पूर्ण केलेल्या मुंबई, सोलापूर आणि ठाणे आयुक्तालयासह, ठाणे, धुळे, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा, कोल्हापूर, पालघर ग्रामीण पोलिस दल तसेच राज्य राखीव पोलिस दल धुळे या पोलिस दलातून ६७ जणांची नाशिक पोलिस आयुक्तालयात आंतरजिल्हा बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांकडून पोलिस मुख्यालयात पाच वर्षे सेवा बजावण्यासंदर्भात बंधपत्र भरून घेण्यात आले आहे.