

नाशिक : जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या अधिक्षकपदी बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील याआधी पालघर येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी (दि. २३) ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने नुकत्याच भारतीय पोलिस सेवेतील १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात नाशिकचे माजी अधिक्षक विक्रम देशमाने यांची मुंबई येथे पोलिस उपमहानिरीक्षकपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीणचे अधीक्षकपद रिक्त होते. सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने या ठिकाणी काम केलेल्या अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती होईल अशी चर्चा होती. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. मात्र, गुरुवारी (दि. २२) २१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पालघरचे पोलिस अधीक्षक पाटील यांची नाशिकला नियुक्ती केली आहे. पाटील हे २००१ च्या तुकडीचे पोलिस उपअधीक्षक असून सांगली येथून त्यांच्या सेवेला प्रारंभ झाला. अकोला येथे उपअधीक्षकानंतर सांगली येथे पुन्हा अपर अधीक्षक म्हणून काम पाहिले. ठाणे आयुक्तालयात काम करीत असताना २०२० मध्ये त्यांना आयपीएसपदी बढती मिळाली. पाटील हे शुक्रवारी (दि.23) नाशिकचा पदभार स्विकारण्याची शक्यता आहे.