

नाशिक : निल कुलकर्णी
एखाद्याचे पशुपक्ष्यांवरील प्रेम, भूतदया त्याला जागतिक विक्रमाकडे नेते आणि ते एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होते असे कुणी सांगितले तर स्वप्नवत वाटेल. परंतु हेच स्वप्न पिंपळगाव बसवंत येथील पक्षिमित्र हरेश शाह यांचे मूर्तिमंत रूपात साकारले आहे. त्यांनी तयार केलेल्या अजस्र फीडरमधील धान्य खाऊन दररोज सुमारे सहा ते सात हजार पक्षी तृप्त होत आहेत.
चिमणी घरट्याचे व्यावसायिक पक्षिमित्र शाह यांनी नोकरी सोडून पक्षिप्रेमापोटी चिमणी घरटे, फीडर व्यवसायात उडी घेतली. २०२२ मध्ये त्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात अजस्र फीडरची नोंद 'वर्ल्ड गिनीज बुक'मध्ये झाली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत हे फीडर आणि त्यातील धान्य खाणारे पक्षी बघण्यासाठी अनेक पर्यटक भेट देत असल्याने हे पक्षितीर्थ झाले आहे. दररोज सात हजार पक्षी सकाळी आणि सायंकाळी फीडरमधील धान्य टिपण्यासाठी येतात. नांदूरमधमेश्वर या नैसर्गिक पक्षितीर्थानंतर शाह यांचे हे स्थळही मानवनिर्मित 'पक्षितीर्थ' म्हणून नवीन बिरुदावली मिरवत आहे. केवळ चिमण्याच नव्हे तर भारव्दाज, कोकीळ, पोपट, कोतवाल, बूलबुल, नीलकंठ, नीलपंख यांसह अनेक पक्षी येथे मुक्तपणे दाणा टिपताना दिसतात.
उन्हाची काहिली वाढत असताना पक्ष्यांचे मुख्य खाद्य- कीटक-कमी झाले आहेत. त्यामुळे या अजस्र फीडरवर बसून शेकडो पक्षी एकाच वेळी धान्य टिपताना पाहणे हा नजारा विलक्षण सुंदर दिसतो आणि तोच डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांचा ओढा येथे वाढला आहे. शिवाय हा प्रकल्प पक्ष्यांचे 'परमा कल्चर' म्हणून यशस्वी झाल्याने पक्षी पिकांची नासाडी न करता येथील धान्य खाण्यास जात असल्याने आसपासच्या शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढले आहे.
पश्चिम व्हर्जिनियातील ग्रीन बॅरियर देशातील विल्यम ग्रीने यांनी यापूर्वी मोठा फीडर तयार केला होता. त्यांचा विक्रम मोडीत काढून शाह यांनी पिंपळगावी अजस्र फीडर निर्माण करून पक्षितीर्थ वसवले असून, त्याची दखल राज्य पर्यटन विभागाने 'सामाजिक पर्यटन केंद्र' म्हणून घेतली आहे.
परमा कल्चर ही एक कृषी संकल्पना असून, त्यात इको सिस्टिमचा विकास करून पक्षी, कीटक, शेतीपूरक जीवांचे संवर्धन करणे आणि त्यातून शेतीव्यवसाय वाढवणे हे अपेक्षित असते. शाह यांच्या पक्ष्यांच्या या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या शेतीसाठी पक्ष्यांचे परमा कल्चर तयार झाल्याने धान्य जोमदार वाढत आहेत. पक्ष्यांसाठी असा प्रयोग यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे पक्षितज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांनी कृत्रिम घरटी लावून केला होता.
फीडरमध्ये दररोज २५० ते ३०० किलो धान्य टाकले जाते. सकाळी आणि सायंकाळी मिळून सुमारे सहा हजारांहून अधिक पक्षी ते दाणा टिपण्यासाठी येत असतात. यासह या विभागात कृत्रिम घरटी, वॉटर फीडर लावले असून, पक्ष्यांची मंजुळ किलबिल ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
हरेश शाह, विक्रमी फीडरचे निर्माते तथा पक्षिमित्र, पिंपळगाव बसवंत, नाशिक.