Nashik Pesa strike | राणी दुर्गावती करे पुकार, उलगुलान उलगुलान...
नाशिक : "राणी दुर्गावती करे पुकार, उलगुलान उलगुलान, न्याय द्या न्या द्या, आदिवासींना न्या द्या" अशा घोषणा देत तपोवनातून निघालेला आदिवासींचा मोर्चा बुधवारी (दि. २८) दुपारी अडीच वाजता आदिवासी विकास भवन येथे धडकला. याठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी झालेल्या सभेत माजी आमदार तथा आदिवासी नेते जे. पी. गावित यांनी पेसाभरती होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा निर्धार व्यक्त केला.
आदिवासी १७ संवर्ग पेसा भरतीबाबत आदिवासी उमेदवारांचे १ ऑगस्टपासून आदिवासी विकास भवनसमोर आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्याने आदिवासी नेते गावित यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २८) तपोवनपासून मोर्चा काढण्यात आला. सकाळी साडेबाराच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात झाली.
भरपावसात सभा
मोर्चा निघाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. मात्र तरीही मोर्चा थांबला नाही. मोर्चाची सांगता सभेने झाली. चिंतामण गावित, भास्कर गावित, जे.पी. गावित यांची भाषणे सुरू असताना पावसाच्या सरींनी हजेरी लावली. मात्र मोर्चेकरी सभेला बसून राहिले. काही मोर्चेकर्यांनी सोबत आणलेल्या छत्र्यांचा आसरा घेतला.
आदिवासी भवनसमोरील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी
पुरुषांपाठोपाठ महिलांनी मोर्चा काढला. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा मोर्चेकर्यांची गर्दी झाली. पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त तैनात केला होता. यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन विद्यार्थी व नोकरदार यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. यावेळी सामाजिक संघटनांनी मोर्चेकर्यांना पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या.