

नाशिक : रामकुंड, गांधी तलाव, दुतोंड्या मारूती, टाळकुटेश्वर या चार ठिकाणी गोदावरी नदीपात्रातील जुने व नादुरूस्त झालेले गेट बदलविण्यात येणार आहे. त्याजागी नव्याने गेटची उभारणी केली जाणार आहे. विविध धार्मिक कार्य करण्याकरिता पाणी साठविण्यासाठी गोदावरी नदीपात्रात पाणी अडविले जाते. तसेच पाण्याचा प्रवाह नियंत्रीत करण्यासाठी संबंधित चारही ठिकाणी सद्यस्थितीत ११ गेट आहेत.
गोदावरी नदीवर शहरातील रामकुंड परिसरात रामकुंड, गांधी तलाव, दुतोंड्या मारूती, टाळकुटेश्वर या ठिकाणी मेकॅनिकल गेट बसविण्यात आले आहेत. रामकुंड या ठिकाणी देशभरातून हजारो भाविक विविध स्वरूपाच्या धार्मिक कार्याकरिता येतात. त्यामुळे या भागात भाविकांची वर्दळ मोठ्या स्वरूपात असते. धार्मिक कार्याच्या अनुषंगाने गोदावरी नदीत स्नान करणे तसेच विविध पूजा अर्चा करण्याच्या दृष्टीने नदीपात्रात विविध ठिकाणी पाणी अडविले जाऊन पाण्याचा प्रवाह नियंत्रीत केला जातो. त्यासाठी संबंधित चारही ठिकाणी गेट बसविण्यात आले आहेत. मात्र हे गेट जुने व नादुरूस्त झाल्याने त्याऐवजी आता नवीन गेट बसविण्यात येणार असून, त्यासंदर्भातील ५६ लाख २५ हजार रूपयांच्या प्रकलनाचा प्रस्ताव विद्युत व यांत्रिकी विभागाने महासभेवर मंजुरीसाठी सादर केला आहे.
गोदावरी नदीवरील रामकुंड येथे दोन, गांधी तलाव येथे पाच, दुतोंड्या मारूती येथे दोन तर टाळकुटेश्वर येथे दोन असे एकूण ११ गेट नादुरूस्त झालेले आहेत. यामुळे या ठिकाणी आता नवीन गेट बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील दरसूचीनुसार प्राकलन तयार करण्यात आले आहे.