नाशिक: प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना येत्या रविवारी पंधरा तारखेला पहिला हप्ता देण्याचे नियोजित आहे. त्यासाठी लाभार्थी नोंदणी करणे, त्यांचे कागदपत्रे पडताळणी करणे यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवशीसुद्धा काम सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये राज्य शासनाकडून आलेल्या उद्दीष्ट, सूचनांबाबत गटविकास अधिकाऱ्यांना माहिती देताना सीईओ गुंडे बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेला यंदा ४४ हजार ९२९ घरकुले देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी ३२ हजार ९१८ अनुसुचित जाती, जमातीसाठी तर १२ हजार ११ इतरांसाठी यामध्ये विभागणी आहे. या सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता येत्या १५ सप्टेंबरला देण्याच्या सूचना राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे सीईओ गुंडे यांनी कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.