नाशिक : नाशिक शिक्षक मतदासंघ निवडणूकीत मेळाव्यांमधून उमेदवारांकडून शिक्षकांना नथ, पैठणी व सफारी कापडाच्या वाटपाचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी सदर प्रकारची दखल घेत यंत्रणांना आचारसंहितेचा आठवण करुन देताना असे प्रकार आढळल्यास थेट कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत घैण्यात आलेल्या मेळाव्यांमध्ये शिक्षक मतदारांना नथ, सफारी कापड तसेच पैठणीसारख्या वस्तूंचे वाटप केल्याची चर्चा रंगली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी गेडाम यांनी विभागातील पाचही जिल्हा प्रशासनांना आदेश देत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक धास्तावले आहेत.
शिक्षक मतदारसंघाचा जाहिर प्रचार साेमवारी (दि. २४) सायंकाळी थंडावला. तत्पूर्वी मागील तीन दिवसांमध्ये उमेदवारांनी जिल्हानिहाय मेळावे घेत शिक्षकांना मतदानासाठी आर्जव केले. याच मेळाव्यांमध्ये शिक्षक मतदारांना नथ, सफारी कापड तसेच पैठणीसारख्या वस्तूंचे वाटप केल्याची चर्चा रंगली आहे. सदर प्रकाराबाबत हेरंब कुलकर्णी यांनी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी गेडाम यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यानूसार गेडाम यांनी विभागातील पाचही जिल्हा प्रशासनांना आदेश देत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने ॲक्शन मोडवर आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षप्रमुख राजेंद्र वाघ यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तसेच सर्व मुख्याध्यापकांना पत्र काढले आहे. सदर पत्रामध्ये निवडणूकीत कोठेही आचारसंहिता भंगाचा प्रकार घडणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही शाळेत असा अनुचित प्रकार ऊघडकीस आल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक धास्तावले आहेत.
शिक्षक निवडणूकीमध्ये मतदारांना विविध वस्तूंच्या प्रलाेभनाबाबतचा प्रकार जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतला आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व्यवस्थापनांना पत्र काढले आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल, असे पत्रात नमूद केले आहे.