Nashik onion purchase fraud | कांदा खरेदीचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक

फिर्यादीकडून २७ लाख १० हजार रुपये वेळोवेळी आरोपींनी त्यांच्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले
Onion News / 
कांदा
Published on
Updated on

नाशिक : उच्च प्रतीचा कांदा कमी भावात खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तसेच कंपनीच्या गोदामावर कर्ज घेण्यासाठी जादा रकमेचे ट्रान्झॅक्शन दाखवणे आवश्यक असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याची ५० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संदीप दिघे (रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, नाशिकरोड) हे व्यापारी आहेत. आरोपी मुकेश दराडे, अर्चना दराडे, गोरखनाथ बर्गे, शेखर पवार व गणेश गीत हे उपनगर येथील साई सन्मान फार्म प्रोड्युसर लि. कंपनीचे संचालक आहेत. या आरोपींनी संगनमत करत फिर्यादी दिघे यांना त्यांच्या ओळखीच्या शेतकऱ्यांकडून उच्च प्रतीचा कांदा कमी भावात खरेदी करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून २७ लाख १० हजार रुपये वेळोवेळी आरोपींनी त्यांच्या बँक खात्यांवर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

आरोपी मुकेश दराडे याने फिर्यादी दिघे यांना नाशिकरोड येथे दत्तमंदिर सिग्नलजवळ भेटून दराडे याच्या कंपनीच्या गोदामावर कर्ज घेण्यासाठी त्याच्या बँक खात्यावर जास्त रकमेचे ट्रान्झॅक्शन दाखवणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी फिर्यादी दिघे यांच्याकडून २७ जून २०२५, ३ जुलै २०२५, ४ जुलै २०२५ व १७ जुलै २०२५ या कालावधीत ४९ लाख ५० हजार रुपये रोख घेऊन त्यापैकी २९ लाख रुपये हे त्यांच्या साईसन्मान फार्म प्रोड्युसर लि. कंपनीच्या खात्यावर आणि २० लाख रुपये क्रांतिवीर व्ही. एन. नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या खात्यावर जमा करून ती रक्कम फिर्यादीच्या बँक खात्यावर जमा केली.

दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीत मुकेश दराडे यास शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीसाठी दिलेल्या पूर्ण रकमेचा कांदा माल शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे भासवून अद्याप फक्त ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा ३० टन कांदा सुरत येथे कांदा व्यापाऱ्याला पाठवून उर्वरित कांद्याची फिर्यादीच्या संमतीशिवाय परस्पर विल्हेवाट लावली. मिळालेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरत फिर्यादीची फसवणूक करत पैशांचा अपहार केला. फिर्यादीने आरोपी मुकेश दराडे याच्याकडे २३ लाख ५० हजार रुपयांची उर्वरित रक्कम मागितली. मात्र, दराडे याने वेळोवेळी खोटी बिले तयार करत त्याच्या मोबाइलवरून व्हॉट्सॲपद्वारे फिर्यादीच्या मोबाइलवर पाठवून रक्कम परत न देता सुमारे ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी साई सन्मान फार्म प्रोड्युसर लि. कंपनीच्या पाच संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news