नाशिक : जिल्ह्यात महिनाभरापासून अवैधरीत्या सुरू असलेल्या एलडीओ (लाइट डिझेल ऑइल) विक्री केंद्राची तपासणी करून त्यांची नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यात एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात येईल, असा इशारा नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनने जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, असोसिएशनच्या विविध सभासदांनी जिल्ह्यात चालणाऱ्या बेकायदेशीर एलडीओ विक्री केंद्रांना माहिती घेण्याच्या उद्देशाने भेट दिली. या भेटीप्रसंगी बहुतांश विक्री केंद्रांनी एनए परवानगी न घेताच विक्री सुरू केल्याचे निदर्शनास आले. कुठल्याही विक्री केंद्राकडे खरेदीचे बिल अथवा इनव्हाॅइस नाही. एलडीओ हे स्थानानुसार ३ ते ६००० लिटर प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये (प्रत्येक टाकीत १०००) साठवलेले आहेत. त्यासाठीची संबंधित विभागाची परवानगी घेतलेली नाही. विक्री युनिटवर कर्मशियल वापरासाठी नाही, असे लिहिलेले असताना वजनमाप विभागाकडून पडताळणी न करताच विक्री केली जाते आहे. डिझेल वाहनामध्ये एलडीओ भरले जात असून, विक्रीचे बिल देण्यात येत नाही. एलडीओ केवळ बॉयलर व इतर उष्णता संबंधित उपकरणात वापरले जाते. तालुका सहकार उपनिबंधकांनी बैठका घेत बेकायदेशीर खासगी एजंटांना अवैध व्यवसायाला उत्तेजन देण्याचे काम केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
अवैधरीत्या सुरू असलेल्या एलडीओंची तपासणी करून नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यातील साधारणत: 450 पेट्रोलपंपचालक हे निषेध म्हणून एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळतील, असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे व पदाधिकारी यांनी दिला आहे.