

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : 'पायी हळूहळू चला, मुखाने जय अंबे बोला' असा जयघोष करीत मध्य प्रदेशातून व धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून हजारो कावडधारक आपापल्या भागातील पवित्र जल घेऊन मार्गस्थ झाले आहेत. यामध्ये प्रदेशातून बडवानी राजघाट येथील नर्मदा नदीतून पवित्रजल घेतले जाते. तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील कावडधारी प्रकाशा येथील तापी, गोमती, पुलिंदा येथील जल घेऊन कोजागिरी पौर्णिमेसाठी कावडधारी मोठ्या संख्येने गडाकडे निघाले आहेत. यामध्ये महिला पुरुष, लहान मुलांचा देखील समावेश असतो. काही भक्त पंचवीस ते तिस वर्षांपासून कावड यात्रेत सहभागी झालेले असतात. कावड यात्रा केल्यास आपली इच्छित मनोकामना निश्चितच पूर्ण होते,असा भाविकांचा विश्वास आहे.काही वृद्ध भाविक गडावर जाऊ शकत नाही ते भाविक वणीच्या जगदंबेस पवित्र जल अर्पण करतात कावडधारकांसाठी ठिकठिकाणी भक्तांकडून पिण्याचे पाणी,चहा,नाश्ता तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात येते.कोजागरी पौर्णिमेला वणीच्या जगदंबा मातेची रात्री 12 वाजता महाआरती करण्यात येते. त्या अगोदर या जलाने भगवतीचे स्नान केले जाते.