

नाशिक : जुन्या नाशिकमधील चव्हाटा परिसरातील जुना वाडा कोसळल्याच्या घटनेनंतर शहरातील धोकादायक वाडे, जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने सहाही विभागांतील १,१८१ धोकादायक वाडे, जुन्या इमारती, मोडकळीस आलेल्या घरांना नोटिसा बजावल्या होत्या.
जुन्या इमारती संबंधित मालक, भोगवटादारांनी मोकळ्या न केल्यास पोलिस बळाचा वापर करून त्या उतरवून घेण्याचा तसेच वीज- पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा महापालिकेने या नोटिसींद्वारे दिला होता. मात्र पालिकेची ही कारवाई केवळ नोटिसांपुरतीच मर्यादित राहिल्याने धोकादायक घरे, जुन्या इमारतींमध्ये आजही नागरिकांचे जीव मुठीत घेऊन वास्तव्य कायम आहे.
विभाग- धोकादायक घरे- वाडे
नाशिक - पश्चिम- ६९०
सातपूर - ६१
नाशिक पूर्व - १२७
नवीन नाशिक - ५०
पंचवटी - १७६
नाशिकरोड - ७७
एकूण - १,१८१
शहरात दीड लाखावर मिळकती ३० वर्षांहून अधिक जुन्या असून, सुमारे २५ हजार १०२ मिळकती या ७० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. महापालिकेने वारंवार सूचना देऊनही संबंधित मिळकतधारकांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. महापालिकेने काही वर्षांपूर्वी विभागीय अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या सर्वेक्षणात यापैकी तब्बल १,१८१ जुने वाडे, जीर्ण घरे धोकादायक असल्याचे आढळले होते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या धोकादायक वाडे, घरांना महापालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात येतात. मात्र संबंधित वाडे, घरांच्या मालकांकडून महापालिकेच्या या नोटिसींना केराची टोपली दाखविली जाते. या १,१८१ पैकी ४६८ जुने वाडे, घरे हे अतिधोकादायक स्थितीत आढळले आहेत. वादळी पाऊस, वाऱ्यामुळे अतिधोकादायक वाडे कोसळून जीवित व वित्त हानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित मालकांना अंतिम नोटिसा बजावत धोकादायक वाडे, घरे तातडीने उतरविण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यापैकी तेली गल्लीतील रहाळकर रोडवरील वाडेधारकाने वाडा उतरविण्याची तयारी दर्शवत, महापालिकेकडे एक लाख ४६ हजारांची रक्कम भरली. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने खासगी मक्तेदाराकडून या वाड्याचे पाडकाम करत परिसर सुरक्षित केला. मात्र, उर्वरित अतिधोकादायक वाड्यांच्या मालकांनी अद्यापही महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. गुरुवारी पावसामुळे जुन्या नाशिकमधील चव्हाटा परिसरातील जुन्या वाड्याचा भाग कोसळल्यामुळे धोकादायक वाडे, जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.