Nashik Air Quality | राष्ट्रीय स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिकचा डंका! प्रभाग 7 देशात तिसऱ्या क्रमांकावर

Nashik Air Quality | प्रभाग 7 देशात तिसऱ्या क्रमांकावर
Nashik Air Quality
Nashik Air Qualitypudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन कॅप) अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिक महापालिकेचा डंका वाजला आहे. या अंतर्गत वॉर्डस्तरीय सर्वेक्षणात नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ ला देशपातळीवरील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

Nashik Air Quality
Nashik SIR Voter | नाशिक जिल्ह्यातील 7 लाखांहून अधिक मतदारांना नोटीस; 'एसआयआर' पडताळणी प्रक्रियेला वेग!

नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपायुक्त संगीता नांदूरकर उपस्थित होत्या.
नवी दिल्ली येथील इंदिरा पर्यावरण भवनातील गंगा सभागृहात आयोजित राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय हरित अधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाचे अध्यक्ष राजेश वर्मा, पर्यावरण सचिव तन्मय कुमार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमनदीप गर्ग यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वॉर्डस्तरीय गटात उत्तर प्रदेशातील लखनौ महापालिका हद्दीतील झोन चार मधील प्रभाग ७० ला पहिले तर मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातील प्रभाग क्रमांक ६० ला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावरील नाशिक महापालिकेला ३० लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
राज्यस्तरीय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील पुणे येथील वॉर्ड क्रमांक ४ व ७ आणि अमरावती येथील वॉर्ड क्रमांक १२ यांची निवड करण्यात आली आहे. या वॉर्डना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना एकूण ५ कोटी २५ लाख रुपये, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वॉर्डना २ कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. ही पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे.

लखनौ पहिले, नाशिक २९वे

१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात उत्तर प्रदेशातील लखनौने प्रथम, मध्य प्रदेशातील इंदूरने द्वितीय, तर जबलपूरने तृतीय क्रमांक मिळविला. या गटात नाशिक २९व्या क्रमांकावर आहे. नाशिकला १६०.२ गुण मिळाले आहेत. ३ ते १० लाख लोकसंख्या गटात ओडिशातील राऊरकेला प्रथम, तर फिरोजाबाद आणि गुंटूर यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या गटात कलिंगनगर, अंगुल आणि तालचेर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.

Nashik Air Quality
Nashik ZP CEO Omkar Pawar | तिसरीच्या विद्यार्थ्यांना वाचन-लेखनात अडचणी; नाशिक जि. प. सीईओ ओमकार पवार आक्रमक!

अमरावती तिसऱ्या क्रमांकावर

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ३ ते १० लाख लोकसंख्या गटात अमरावती शहराने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. यासाठी शहराला २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

"स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिकची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाने आनंददायी आहे. नाशिकचे वातावरण अतिशय चांगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात उन्नत नाशिक अभियान राबविले जात आहे. या माध्यमातून आगामी काळात स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिकचे नाव देशात पहिल्या क्रमांकावर झळकेल यात शंका नाही."

- हिमगौरी आहेर-आडके, महापौर, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news