

नाशिक : घरी गरीबी पाचवीला पुजलेली असली तरी अवकाशी झेप घेण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या महापालिका शाळांमधील ३० विद्यार्थ्यांना लोकसहभागातून घडविलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो'ची सफर लक्षवेधी ठरली आहे.
आनंदवली येथील शाळा क्रमांक १८ मधील विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रयोगशीलतेमुळे शाळेतील ऍस्ट्रॉनॉमी क्लब अंतर्गत ही संस्मरणीय 'इस्त्रो'ची सफर घडवून आणता आली आहे.
शाळेतील ऍस्ट्रॉनॉमी क्लब अंतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळशास्त्रा विषयी विविध प्रश्न पडले होते. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना इस्रोभेट घडवता येईल का? यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्यासमोर मांडला. त्यास परवानगी मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या अभ्यास दौऱ्यावर नेण्यात आले.
शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील, केंद्रप्रमुख सुनील खेलूकर, प्रकाश शेवाळे, मुख्याध्यापक अनिता जाधव व सहा शिक्षक कुंदा बच्छाव, वैशाली भामरे, वैशाली पाटील, ममता सुंठवाल, अमित शिंदे, कैलास गायकवाड असे एकूण 40 जण बंगळुरू येथील इस्त्रोच्या केंद्रात पोहोचले. याठिकाणी इस्रोचे सेक्रेटरी व्ही. नारायणन व विभागप्रमुख शंकर मधास्वामी यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या अंतराळशास्त्रा विषयीच्या विविध प्रश्नांची उत्तर त्यांनी दिली.
संपूर्ण दिवसभर इस्त्रो केंद्रांची सफर घडविण्यात आली.रॉकेटचे उड्डाण कसे केले जाते? अवकाशात सॅटॅलाइट उपग्रह कसे सोडले जातात? त्याचा कंट्रोल जमिनीवरून कसा केला जातो? तसेच अवकाशातील विविध उपग्रहांपर्यंत एंटीना द्वारे पाहिजे तेव्हा कसे पोहोचले जाते? आजपर्यंत इस्रोने सोडलेले विविध उपग्रह व यापुढे इस्रोचे असलेले प्रोजेक्ट अशा विविध प्रश्नांमधून विद्यार्थ्यांनी अवकाशशास्त्राची माहिती करून घेतली. रॉकेट प्रक्षेपण कसे केले जाते याचे प्रात्यक्षिकही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी करून दाखवले. इस्रो सेंटर येथे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कोणकोणत्या वाटा आहेत, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागेल याचीही माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
सहलीच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी तसेच ऐतिहासिक सालरजंग संग्रहालय व गोळकोंडा किल्ल्याचीही सफर घडविली गेली. निजाम काळातील विविध बाबींची माहिती यामुळे विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. अशा प्रकारे चार दिवसांचा अभ्यास दौरा सहलीत विद्यार्थी भरपूर ज्ञान प्राप्त करून नाशिकला परतले.