

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व पावसात श्री कपालेश्वर महादेव मंदिराशेजारील जुन्या वाड्याच्या भिंती, पत्रे कोसळून एक भाविक गंभीर जखमी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत धोकादायक ठरलेला विवलकर वाडा आणि त्यावरील बेकायदेशीर पत्राशेडचे अतिक्रमण हटविण्यासाठी नाशिक मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक सलग दुसऱ्या दिवशीही आले होते. मात्र कोणतीही ठोस कारवाई न करता रिकाम्या हाताने परतले.
एका बड्या राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळेच प्रशासनाने माघार घेतल्याची चर्चा आहे. पंचवटी विभागीय कार्यालयाने एका अनधिकृत बांधकामाबाबत दि. २९ ऑगस्ट २०२४ला पहिली व दि. ८ ऑक्टोबर २०२४ ला दुसरी नोटीस बजाविली होती. त्यानंतर ३१ जुलै २०२५ रोजी संबंधितांना खर्चाची नोटीस जारी केली होती. यात स्वतःहून अतिक्रमण न हटविल्यास मनपाकडून होणाऱ्या कारवाईचा खर्च (अंदाजे १ लाख २६ हजार रुपये) वसूल केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
कपालेश्वर संस्थानने कायदेशीर प्रक्रियेचा आदर करत कारवाईसाठी लागणारा हा संपूर्ण निधी २१ ऑक्टोबर २०२५ रोजीच मनपाकडे जमा केला होता. मात्र, पैसे भरून अनेक महिने उलटले, तरी मनपाने प्रत्यक्ष कारवाई केली नाही. शुक्रवारी (दि. ५) सकाळी मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक हे पोलिस बंदोबस्त आणि मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, काही वेळातच कोणतीही कारवाई न करता अचानक माघारी फिरले.
हा वाडा श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या मालकीचा असून, त्याचा काही भाग महापालिकेने आधीच अतिधोकादायक घोषित केला आहे. उर्वरित जागेवर सुमारे (१५ बाय २५ फूट) आकाराचे लोखंडी अँगल आणि पत्र्यांचे विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. संस्थानने याविरोधात वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा थेट आरोप केला जात आहे.
भक्त निवास उभारण्याचा मानस
कपालेश्वर मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हे धोकादायक व अतिक्रमित बांधकाम हटविल्यानंतर त्या जागेवर भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक भक्त निवास आणि इतर नागरी सुविधा उभारण्याची संस्थानची योजना आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासन कारवाई लांबणीवर टाकत आहे.