

नाशिक : पाणीपट्टी देयक वाटपाच्या खासगीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, मक्तेदारामार्फत सोमवार (दि. 28) पासून पाणीपट्टीच्या 'स्पॉट बिलिंग'ला सुरुवात केली जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनचाही शोध मक्तेदाराच्या पथकामार्फत घेतला जाणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेकडून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
मोठ्या प्रमाणात होणारी गळती आणि ४० टक्के हिशेबबाह्य पाणीवापरामुळे महापालिकेचे पाणीपुरवठा व्यवस्थापन तोट्यात आहे. त्यातच करवसुली विभागाकडे मनुष्यबळही उपलब्ध नसल्यामुळे पाणीपट्टीची देयके पुरेपूर वाटली जात नाहीत. परिणामी, पावणेदोनशे कोटींची पाणीपट्टीची देयके प्रलंबित आहेत. त्यावर उपाय म्हणून पाणीपट्टी देयक वाटपाचे खासगीकरण तसेच खासगी मक्तेदारामार्फत अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी रीतसर निविदाप्रक्रिया राबवून कॅनबेरी या मक्तेदाराला काम देण्यात आले आहे. या मक्तेदाराने काम सुरू केले असून, सोमवारपासून पाणीपट्टी देयक वाटपासाठी मक्तेदाराचे पथक नळकनेक्शनधारकांच्या घरोघरी जाणार आहे. मीटरवरील रीडिंग घेऊन त्याच ठिकाणी बिल नळकनेक्शन धारकास दिले जाईल.
पाणीपट्टीची अद्ययावत कार्यप्रणाली तयार करणे, देखभाल व दुरुस्ती, ग्राहकांना पाणीपट्टी देयकांचे वाटप करणे, नळ कनेक्शनधारकांचा मोबाइल व ई- मेलचा डाटा गोळा करणे, नळजोडणीचा संपूर्ण पत्ता अशा सर्व बाबींची माहिती घेण्याची जबाबदारी मक्तेदार कंपनीवर आहे.
एप्रिल महिन्यामध्येच बिलेवाटप करताना कोणाकडे पाणी मीटर आहे किंवा नाही याची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. पाणी मीटर नसलेल्यांना 15 दिवसांचा अवधी मीटर बसविण्यासाठी दिला जाईल. त्यानंतरही मीटर न बसविल्यास संबंधितांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे कर विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी सांगितले.
पुढील आठवड्यापासून स्पॉट बिलिंग देण्याच्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. त्यादृष्टीने तयारीदेखील झाली आहे. पहिल्या तिमाहीत ॲव्हरेजली बिले दिली जातील. या काळात 100 टक्के मीटर बसवून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. त्यानंतर मात्र पाणी वापरानुसारच बिले अदा केली जाणार आहेत.
अजित निकत, उपायुक्त, कर विभाग मनपा, नाशिक.