

नाशिक : मॅनहोलची स्वच्छता करताना सफाई कर्मचाऱ्यांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी रोबोटद्वारे मॅनहोल सफाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नाशिकसह राज्यातील २७ महापालिकांसाठी ही रोबोट खरेदी केली जाणार आहे. सफाई कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
देशभरात अनेक शहरांमध्ये मॅनहोल सफाईसाठी कामगारांना थेट मॅनहोलमध्ये उतरवले जाते. त्यामुळे कामगारांना विषारी वायू, ऑक्सिजनची कमतरता आणि अपघात यांसारख्या जोखमींना सामोरे जावे लागते. या पारंपरिक पद्धतीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास ८१ सफाई कर्मचाऱ्यांना यामुळे प्राणास मुकावे लागले आहे. त्यामध्ये मुंबई आणि उपनगरांतील ११, ठाणे जिल्ह्यातील १२, पालघरमधील ७ आणि रायगडमधील २ कामगारांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी नाशिकमध्येही तीन विविध घटनांमध्ये आठ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने अशा कामांचे सामाजिक लेखापरीक्षण केले. त्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची दखल घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे मॅनहोलच्या सफाईसाठी रोबोट खरेदीचा प्रस्ताव समोर आला. यात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारने मॅनहोल सफाईसाठी १०० रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकसह मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हे रोबोट कार्यरत होणार आहेत. सफाई कामगारांचे जीव वाचवण्याबरोबरच मॅनहोल सफाई प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होणार आहे.
केरळ राज्यात मॅनहोल सफाईसाठी रोबोटचा यशस्वी वापर केला जात आहे. या यशस्वी प्रयोगाचा दाखला घेत महाराष्ट्रानेही हा निर्णय घेतला आहे. मात्र, महाराष्ट्रात खरेदी होणारे रोबोट स्वदेशी बनावटीचे असतील. या रोबोटमध्ये कचरा साफ करण्याची आणि तो वेगळे करण्याची उच्च क्षमता असेल. त्यामुळे मॅनहोलमधील घाण आणि कचरा प्रभावीपणे हटवला जाईल. तसेच, हे रोबोट मानवी हस्तक्षेपाशिवाय काम करू शकतील. ज्यामुळे कामगारांना मॅनहोलमध्ये उतरण्याची गरज भासणार नाही.
सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू टाळण्यासाठी मॅनहोलची सफाई रोबोटद्वारे करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य शासनाने सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छताविषयक सुरक्षा साधने पुरविण्याबाबत महापालिकांना आदेश द्यावेत. शहराचे आरोग्य सांभाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे महापालिकांनी दुर्लक्ष करू नये.
सुरेश मारू, पदाधिकारी, सफाई कर्मचारी संघटना, नाशिक.
सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे. मॅनहोलच्या सफाईसाठी दोन रिसायकल व ६ जेट मशीन खरेदी करण्यात आले आहेत. आणखी दोन जेट मशीन तसेच दोन थ्री इन वन युनिट खरेदी केले जात आहे. महापालिकेने यापूर्वी रोबोट यंत्राचीदेखील चाचणी घेतली आहे.
गणेश मैंद, कार्यकारी अभियंता, मलनिस्सारण, नाशिक