

नाशिक : आसिफ सय्यद
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य-वैद्यकीय विभाग हा अॅक्शन मोडमध्ये आला आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना तत्काळ आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी वैद्यकीय विभागाने सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन, संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध आणि २४ तास तत्पर वैद्यकीय सेवा ही या नियोजनाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
येत्या २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थासाठी कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. या भाविकांच्या सुविधेसाठी महापालिकेसह शासकीय रुग्णालयांमधील खाटांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. मनपा रुग्णालये सध्या असलेल्या ६०५ खाटांवरून अतिरिक्त ३०० खाटा वाढवून ती संख्या ९०५ करण्यात येत आहे.
यात १०० आयसीयू खाटांचा समावेश असेल. जिल्हा रुग्णालय आणि इतर शासकीय रुग्णालयांत अतिरिक्त ३४० खाटा वाढवून एकूण संख्या १०४० करण्यात येत आहे. अशाप्रकारे नाशिकमधील सर्व प्रमुख रुग्णालये मिळून १९४५ खाटा भाविकांसाठी उपलब्ध असतील. ज्यात तब्बल १८५ आयसीयू खाटा राखीव ठेवल्या जातील.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि सुलभ आरोग्यसेवा पुरवणे हे आमचे ध्येय आहे. घाटांपासून ते पार्किंग लॉट्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात असतील. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अवघ्या काही मिनिटांत उपचार सुरू करता येतील.
-विजय देवकर, वैद्यकीय अधीक्षक, मनपा