

नाशिक : उमेदवारी अर्ज माघारीनंतर शनिवारी (दि. ३) चिन्हवाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारांना त्या त्या पक्षांचे चिन्ह देण्यात आले, तर अपक्षांना निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या चिन्हापैकी पसंतीक्रमानुसार चिन्हवाटप करण्यात आले.
अपक्ष उमेदवारांमध्ये चिन्हांसाठी चढाओढ दिसून आली. सकाळपासूनच उमेदवारांसह त्यांचे समर्थक पूर्व विभागाच्या कार्यालयात दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या वस्तूंची चिन्हे देण्यात आली असून, चिन्ह मिळताच उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. चिन्हवाटपावेळी उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि थोडीफार तणावाची भावना जाणवत होती. चिन्हवाटपामुळे निवडणूक रणधुमाळीला अधिक वेग येणार असल्याचे चित्र आहे.
चावी, कपबशी अन् गॅस सिलिंडर
सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील एबी फॉर्म रद्द झाल्यामुळे चर्चेत आलेल्या भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार भाग्यश्री ढोमसे यांना कपबशी, प्रकाश अमृतकर यांना गॅस सिलिंडर हे चिन्ह देण्यात आले, तर प्रभाग २९ मधून भाजप उमेदवार दीपक बडगुजर यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या मुकेश शहाणे यांना चावी हे निवडणूक चिन्ह दिले गेले आहे