

निफाड (नाशिक) : निफाड तालुक्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा लक्षणीयरीत्या घसरला आहे. शुक्रवार (दि.7) आणि सोमवार (दि.10) या दोन दिवसांच्या नोंदीनुसार थंडीची तीव्रता वाढल्याचे स्पष्ट होत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.८) किमान तापमान १३.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. मात्र, नंतर केवळ दोन दिवसांत तापमानात मोठी घट झाली. सोमवारी (दि. ११) सकाळी हेच तापमान ९.५ अंश सेल्सिअस इतके खाली आले.
या आकडेवारीनुसार, अवघ्या दोन दिवसांमध्ये किमान तापमान तब्बल ३.६ अंशांनी कमी झाले आहे. तापमानातील या अचानक घसरणीमुळे निफाड परिसरासह गोदाकाठ पूर्णपणे गारठून गेला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील जनजीवनावर परिणाम झाला असून, द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढलेली थंडी द्राक्ष व गहू पिकांसाठी काही प्रमाणात पोषक असली, तरी तापमान आणखी खाली गेल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.