

निफाड : निफाड तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी विविध प्रकारच्या पान वनस्पती आणि पानवेलींमुळे अक्षरश: झाकोळून गेली आहे. नदीपात्रात या पानवेलींचा पसारा इतका वाढलेला आहे की नदीपात्र हे एखादे मोठे हिरवे कुरणच आहे की काय असे वाटू लागते. सध्या गोदावरी, दारणा आणि त्यांच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होत असल्याने गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढलेली आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून देखील गोदापात्रात चांगलाच पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे पाण्याला चांगलाच वेग देखील आलेला आहे. या सर्व परिस्थितीमुळे नदीपात्रात फोफावलेल्या पानवेली आणि अन्य पान वनस्पती या वेगवान प्रवाहात वाहून जाण्यास प्रारंभ झाला आहे.
परंतु या वाहून जाणाऱ्या पानवेलींचा अफाट पसारा करंजगाव आणि कोठुरे दरम्यानच्या नदीपात्रातील पुलाच्या भिंतींना अडकून पडत आहे. यामुळे पाण्याचा प्रचंड फुगवटा या पुलाला तसेच आजूबाजूच्या शेतजमिनींना धोका निर्माण झाला आहे. पुलाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने या पुलाला अडकलेल्या पानवनस्पतींचे जंजाळ मोकळे करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सायखेडा, चांदोरी कडून कोठूरे कडे वाहून आलेल्या या प्रचंड स्वरूपातील पानवेली नदीपात्रातून बाहेर काढून टाकणे अशक्य असल्यामुळे त्यांना पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे ढकलून देणे हे जास्त योग्य समजले जाते. यामध्ये मनुष्यबळ आणि खर्च यात बचत होत असली तरी या पानवेली नांदूर मधमेश्वर धरणाच्या भिंती, गेट आणि नदीपात्रातील अन्य पुलांना देखील अडकण्याचीच जास्त शक्यता आहे.
हा सर्व एकूण प्रकार एका शेजारणीने आपल्या अंगणातला कचरा दुसऱ्या शेजारणीच्या अंगणात लोटून द्यावा तसेच काहीसे म्हणावे लागेल. यातून मूळ प्रश्नाची सोडवणूक न होता गोदापात्रातील पानवेलींचे संकट अधिक गहिरे होत आहे यात शंका नाही.