नाशिक : सीतानवमीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी सोमवारी (दि. ५) श्री काळाराम मंदिरात आंदोलन केले. श्रीरामाच्या नावाने केंद्रात व राज्यात निवडून आलेल्या सरकारला सुबुद्धी दे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्तीची कर्जवसुली थांबवून, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, असे साकडे सीतामातेला घालण्यात आले.
शेतकरी समन्वय समितीचे भगवान बोराडे, 938 आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, दनाजी अहिरे, दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्यांनी निर्देशने केली. जिल्हा बँकेची सक्तीची वसुली बंद करावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, सातबारा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. जिल्ह्यातील 56 हजार शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी जिल्हा बँक सक्तीची मोहीम राबवत असून आतापर्यंत 1100 शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावर बँकेचे व कार्यकारी सहकारी संस्थेचे नाव लावण्यात आले आहे. तसेच 14 ते 15 हजार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरही नावे लावण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. ही कारवाई तत्काळ थांबवण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
दि. ११ एप्रिल रोजी जिल्हा बँकेतील बैठकीत कर्जवसुलीस स्थगिती देण्याच्या सूचना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत. मात्र, वृत्तपत्रांमध्ये नावे देणे व शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करणे ही प्रक्रिया अद्यापही बॅंकेकडून सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलन केल्याचे बोरसे यांनी सांगितले.
आंदोलनात रामदास राऊत, जयवंत राऊत, एकनाथ ठाकरे, सोमनाथ जगताप, ताराबाई ठाकरे, पांडुरंग ठाकरे, धनराज ठाकरे, रामचंद्र गायकवाड, काशीनाथ बागूल, मुरलीधर ठाकरे, तुळशीराम ठाकरे, रवींद्र ठाकरे, कांतिलाल ठाकरे, पांडुरंग जगताप आदी शेतकरी सहभागी झाले होते.