

नाशिक : अन्न, सेंद्रिय कृषी उत्पादने आणि औषधी वनस्पती यांसारख्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या उत्पादनाचे हब महाराष्ट्र असून, येथील उद्योजकांना आपली उत्पादने व्हिएतनामच्या बाजारपेठेत पोहोचविण्याची मोठी संधी असल्याचा सूर, निमा पदाधिकारी व व्हिएतनाम प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यात व्हिएतनामचा हातभार असेल, असेही व्हिएतनामच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
व्हिएतनामच्या 'लेखा मार्ट' कंपनीचे संचालक ले. ट्रॉन्ग खा हे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनी २५ हून अधिक अन्न व कृषी उद्योगांना भेटी देऊन निर्यातवाढीच्या उपाययोजना सुचविल्या. यावेळी निमा पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत, त्यांनी व्हिएतनाममधील बाजारपेठेत स्थानिक उद्योजकांना संधी असल्याचे सांगितले. त्यांनी अन्न व कृषी उत्पादनांबरोबरच मेडिसिनल हर्ब्सच्या निर्यात संधीबाबतही मार्गदर्शन केले. निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी, भारत- व्हिएतनाममधील आयात-निर्यात प्रक्रिया सुलभ झाल्यास, नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. व्हिएतनामच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासमवेत भारताच्या व्यवस्थापन कौशल्याचा संगम झाल्यास नाशिकमधील व्यापाराला नवी दिशा मिळेल. तसेच, स्थानिक उद्योजकांनी आपल्या उत्पादनांचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया यांचा उपयोग करावा, असे आवाहनही नहार यांनी केले.
बैठकीस निमा उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, खजिनदार राजेंद्र वडनेर, सहसचिव किरण पाटील, महाराष्ट्र चेंबर्सचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमा स्किल- स्टार्टअप कमिटी चेअरमन श्रीकांत पाटील, निमा पॉवर सबकमिटी चेअरमन मिलिंद राजपूत, अखिल राठी, कैलास पाटील, राजाराम सांगळे आदी उपस्थित होते.
किशोर राठी यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून अडीच हजारांहून अधिक देशांमध्ये उत्पादने निर्यात केली जात असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांमध्ये नावीन्य ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. श्रीकांत पाटील यांनी, केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध अनुदाने आणि सवलती उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित उद्योजकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.