

नाशिक : एसटी प्रवासासह विविध योजनांचा लाभ लाटण्यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र तयार करून सर्रास लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थींचा भंडाफोड आता होणार आहे. दिव्यांग विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार आता एसटी प्रवास सवलत पासेसची धावत्या बसमध्ये तपासणी करून 'दूध का दूध व पानी का पानी' केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यूडीआयडी अॅपनिर्मिती केली आहे.
बोगस अपंग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला होता. शासनाने दिलेल्या अपंगांसाठीच्या विविध योजनांच्या लाभासह नोकरीतील आरक्षण असेल, पदोन्नतीतील टक्केवारीचा लाभ असो की, नोकरीसाठी सोयीचा ठिकाणी बदलीसाठी अपंग प्रमाणपत्र महत्त्वाचे मानले जाते, त्याचा फायदा घेण्यासाठी राज्यभर बोगस अपंग प्रमाणपत्र तयार करण्याचे कारनामे सुरू झाले होते. त्यासाठी एक फळीच तयार झाली. त्यात एजंटांपासून, तर तपासणी करून प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय सूत्रांपर्यंत ही साखळी होती. त्याचा मागे पर्दाफाश झाला होता. मात्र परत मोहीम थंडावली होती.
तुकाराम मुंढे यांनी अपंग विभागाचे आयुक्त म्हणून पदभार घेताच बोगस अपंगांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी शासकीय नोकरीतीलही काही जणांना बोगस प्रमाणपत्राचा लाभ घेतल्यामुळे निलंबित केले. आता बोगस अपंग प्रमाणपत्र पडताळणीची मोहीमच हाती घेतली आहे. या मोहिमेत एसटी महामंडळाचा प्रवास सवलत पासचा लाभ घेणाऱ्यांसाठीही स्वतंत्र मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतर्गत प्रमाणपत्राचा यूडीआयडी तपासला जाणार आहे. शासन दप्तरी नोंदविलेला यूडीआयडी व प्रमाणपत्रावरील यूडीआयडी याची तपासणी करून त्यात खरे व बोगस प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे.
एसटी विभागाने त्यासाठी यूडीआयडी अॅप तयार केले आहे. ते वाहक, नियंत्रक यांच्या मोबाइलमध्ये असणार आहे. त्यामुळे धावत्या बसमध्येच आता बोगस अपंग सवलतीचा लाभ घेणाऱ्यांचा पर्दाफाश केला जाणार आहे. बोगस अपंग प्रमाणपत्र आढळल्यास संबंधित प्रवाशाचा पास जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सवलत घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.