

नाशिक : विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येताच, सत्ताधारी पक्षात 'इनकमिंग' वाढल्याने, विरोधी पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातदेखील अशीच काहीशी पक्षांतराची चलबिचल सुरू असल्याने, डॅमेज कंट्रोलसाठी चक्क पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये येत आहेत. यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
शालिमार चौकातील शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषद घेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी उपनेते सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, गुलाब भोये आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीतील विजय व त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालाने शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी तांत्रिक बाबींवर मुद्देसूद मार्गदर्शन करणारे तज्ज्ञदेखील शिबिरात उपस्थित राहणार आहेत. मनोहर गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान होणाऱ्या या एकदिवसीय शिबिरासाठी शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या ठाकरे गटाला पराभव विसरून आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांबाबत सध्या तरी अनिश्चितता असली तरी, ठाकरे गटाने गाफील न राहता निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना कानमंत्र दिला जाणार आहे.
पक्षप्रमुख ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित होणारे एकदिवसीय शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून शहरात विभागनिहाय तसेच जिल्हाभर बैठका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दि. ३ ते ५ एप्रिलदरम्यान शहरात विभागनिहाय बैठका पार पडतील, तर दि. ६ ते ९ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका होतील. शिबिरासाठी लवकरच विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.