

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : मुंबई - आग्रा महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने, त्यासाठी केलेल्या एकेरी वाहतुकीमुळे पहिलेच दळणवळण प्रभावित झालेले असताना रविवारी (दि. 22) उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पंक्चर झाल्याने महामार्गावर चक्काजाम झाला होता. पिंपळगाव टोल नाका ते महामार्ग पोलिस चौकीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला.
रविवारी (दि. 22) पिंपळगाव टोलनाका येथे सकाळच्या सुमारास कादवा नदीतीरावर उसाचा ट्रक पंक्चर झाला. रस्त्यात अचानक अवजड वाहन थबकल्याने एका बाजूकडील वाहतूक पूर्णत: थांबली. अत्यंत वर्दळीचा महामार्ग, त्यात टोलनाक्यावरून सुटणारी आणि येणारी वाहने एकाच मार्गिकेवर आल्याने वाहतूक प्रभावित झाली. त्यात बेशिस्त कारचालक आणि दुचाकीस्वारांच्या वाट शोधण्याच्या उपद्व्यापात कोंडीत भर पडली. मोठ्या वाहनांना मार्गस्थ होण्यास मोठी कसरत करावी लागली. जवळपास तीन ते चार तास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रविवारी विवाह मुहूर्त असल्याने वर्हाडींची या परिसरात मोठी गर्दी होती. त्यांच्या वेळेचा खोळंबा झाला.
पिंपळगाव टोलनाका ते ओझर ते पाटाजवळील पोलिस चौकीपर्यंत अशी तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिककडून धुळ्याकडे जाणार्या आणि धुळ्याकडून नाशिककडे येणार्या अनेक वाहनधारकांना यामुळे तासन्तास ताटकळत राहावे लागले. तर अनेक वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करत कोंडीतून सुटका करून घेतली. दरम्यान, दुपारी दोननंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यानंतरही तीनपर्यंत काही प्रमाणात साकोरे पाटाजवळील चौकी परिसरात कोंडीचा फेरा कायम होता.
आग्रा महामार्गाचे टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण सुरू आहे. एक बाजू बंद करून दुसर्या बाजूने वाहतूक होत असली तरी बहुतांश वेळा लहान व मोठी वाहन परिस्थिती नसतानाही ओव्हरटेक करण्याचा चालकांकडून प्रयत्न चाललेला असतो. त्यामुळे सुरळीत वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. एकेरी बाजूने दुहेरी वाहतुकीत व्यत्यय येऊन कोंडी होते. महामार्ग प्राधिकरणाने काँक्रिटीकरणाचे काम करताना पर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्याचा हा परिणाम आहे. साकोरा चौकाजवळ पर्यायी मार्ग असला तरी तो खुला केलेला नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाने याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी चंद्रशेखर हिरे यांसह स्थानिक प्रवाशांनी केली आहे.