

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्यामुळे यंदा पावसाळी हंगामाच्या टोमॅटो लागवडीस उशीर झाल्याने बाजारातील आवक घटली आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव भाव चांगलेच वधारले आहे. बाजार समिती आवक घटल्याने २० किलोच्या क्रेटला ६०० रुपये दर मिळत असल्याने किरकोळ बाजारात टोमॅटोची १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
हवामान बदलाची झळ टोमॅटोला बसली असून उन्हाळ्यात काही दिवस तापमान वाढीमुळे वातावरणात झालेली बदल आणि पाणीटंचाईचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. या संकटावर मात करून वाचलेल्या टाेमॅटोला नंतर अवकाळी पावसाचा झळ बसली परिणामी बाजारात आवक कमी होत असल्यामुळे टोमॅटोच्या बाजारभावात तेजी वाढलेली दिसून येत आहे.
यंदा पाऊस वेळेवर आला, मात्र नाशिक जिल्ह्यात लागवडी योग्य पाऊस नसल्यामुळे टोमॅटो लागवडीस उशीर झाला आहे. त्यामुळे नवीन टोमॅटो बाजारात येण्यास एक महिना उशीर होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत बाजार समित्यांमध्ये उन्हाळ्यात लागवड झालेले टोमॅटो पीक विक्री येत आहे.
टोमॅटो बरोबर इतर भाजीपाला महाग झाल्यामुळे याचा परिणाम काही प्रमाणात किरकोळ विक्रीवर होत आहे. ग्राहक मोजक्या प्रमाणात खरेदी करत असल्यामुळे विक्री कमी होत आहे. बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत मालाला मागणी जास्त असल्यामुळे इतर राज्यातील पुरवठ्यात घट झाली आहे.
साजीद काजी, व्यापारी, नाशिक.
मे ते जून महिन्याच्या कालावधीत पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा तालुक्यातील काही भागात टोमॅटोचे पीक घेतले जाते जून ते ऑगस्टपर्यंत सातारा, सांगली, कोरेगाव या परिसरात टाेमॅटोचे उत्पादन घेतले जाते. या टोमॅटोला २० किलोच्या क्रेटसाठी एक हजार ते बाराशे रुपये भाव मिळत असल्याने ग्राहकाला शंभर ते 120 रुपये प्रति किलो दराने घ्यावा लागतो. ऑगस्टपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व हिवरगावचा टोमॅटो बाजारात येतो. 15 ऑगस्टपासून पिंपळगाव तसेच चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील टोमॅटो बाजारात येतो. याच कालावधीत नाशिक जिल्ह्यातील टाेमॅटो हे सप्टेंबरपासून गिरणारे तसेच दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागातून बाजारात येतो. गेल्या वर्षी टोमॅटोचे प्रचंड उत्पादनामुळे भाव घसरले होते. वाहतूक खर्चही भरून निघणे कठीण झाले होते. त्यामुळे उत्पादकांवर टाेमॅटो फेकून देण्याची वेळ आली होती. सध्या कमी आवकेमुळे टोमॅटोला भाव असल्याने शेतकरी समाधानी आहे.
बाजार समित्यामध्ये टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला ६०० रुपये दर मिळाला. यंदा शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढल्यामुळे टोमॅटो लागवड यंदा कमी आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढलेले आहेत. आता सध्यास्थितीत बाजारभाव चांगला असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.
सुनील गवळी, शेतकरी, नाशिक.