

नाशिक : विकास गामणे
राज्य शासनाने पशुसंवर्धन विभागातील गट अ संवर्गातील पशुधन विकास अधिकारी पद भरतीची जाहिरात काढली आहे. मात्र, या पदाला सहायक असलेले गट ब संवर्गातील सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांची तब्बल 3 हजार पदे रिक्त आहेत. अनेक पदे रिक्त असल्याने कामकाज करताना विभागाला मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तसेच त्यांच्या अधिन असलेले क्षेत्रीय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्त्वाचे आहे. सुधारित आकृतिबंधानुसार राज्यात पशुसंवर्धन सेवा गट अंतर्गत पशुद्धान विकास अधिकारी संवर्गात एकूण 4 हजार 84 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत १ हजार ८८६ पदे भरलेली असून, 2 हजार 798 पदे रिक्त आहेत. तसेच 31 डिसेंबर 2025 अखेर आठ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत. अशी एकूण 2 हजार 806 पदे रिक्त होणार आहेत. ही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.
या गोष्टीची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठपुरावा करून पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात 'पशुधन विकास अधिकारी' या संवर्गाची २ हजार ७९५ पदे भरली जाणार असून, यासाठी एमपीएससीकडून २९ एप्रिल ते १९ मे या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ पशुधन विकास अधिकारी (गट-ब) व सहायक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक ही पदेदेखील महत्त्वाची आहेत. ही पदेदेखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. ग्रामीण भागात पशुधन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी असलेली ही पदे रिक्त असल्याने ही पदे भरावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यामध्ये पशुधन विकास अधिकारी यांच्याबरोबरच पशुधन विकास अधिकारी गट-ब, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. माननीय नामदार पंकजा मुंडे /शासनाने ही पदे तत्काळ भरावी.
डॉ. भगवान पाटील, कार्याध्यक्ष, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, नाशिक.