

नाशिक : शहरात सध्या एका 'लेडी भाई'च्या कारनाम्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातील प्रसिद्ध अण्णा, भाऊ, दादा, मामा या कथित भाईंवर पोलिसांनी बडगा उगारल्यानंतर आता या लेडी भाईने मात्र संपूर्ण जिल्ह्याला थक्क करून सोडले आहे. तिच्या फसवणुकीच्या गोष्टी गल्लोगल्लीत, चहाच्या टपऱ्यांपासून ते कोर्टाच्या आवारापर्यंत चर्चेत आहेत.
ही 'लेडी भाई' म्हणजे चतुराई, धाडस आणि दिखावा यांचा अनोखा संगम. पोलिस, वकील, सरकारी कार्यालये, अगदी कारागृहाच्या कोठड्यांपर्यंत 'मॅनेज' करण्याचा दावा ती सर्रास करते. जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, कोठडीतील सोय या नावाखाली अनेकांना गंडा घालण्याचे तिने जाळे विणले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी, एक राज्यातील नामांकित मंत्री आणि वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे दाखवून ती लोकांच्या विश्वासाला चुना लावते.
फक्त नाशिकच नाही, तर अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांपर्यंत तिच्या 'वीज मीटर रॅकेट'ची पोहोच असल्याची चर्चा आहे. रिमोटद्वारे मीटरमध्ये फेरफार करणे, त्यानंतर बनावट वीज अधिकारी पाठवून सेटलमेंटच्या नावाखाली पैसे उकळणे, ही तिची खास “बिझनेस स्ट्रॅटेजी”! मीटर तपासणीदरम्यान ती स्वतः “मी मुख्य अभियंत्यांशी बोलते” असे सांगून डमी फोन करते आणि तो कॉल तिच्याच माणसाकडे जोडलेला असतो.
विशिष्ट पेहराव, दोन नंबरविरहित आलिशान चारचाकी वाहन आणि एकाच नंबरच्या दोन दुचाक्या, तिची स्टाईलही अगदी सिनेमँटीक आहे. आध्यात्मिक वलय निर्माण करण्यासाठी ती एका दिवंगत बाबाची भक्त असल्याचा आव आणते. या माध्यमातून अनेकांना “काम मिळवून देणे” किंवा “ठेका पक्का करणे” अशा आमिषांमध्ये अडकवते.
नाशिकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू आहे. कुणालाही याबाबत तक्रार करायची असल्यास त्वरित करावी. योग्य ती कठोर कारवाई केली जाईल. कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटणार नाही.
किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
क्राईम ब्रँच युनिट १ ने अलीकडेच शहरातील कथित भाईंना “दिवाळी फराळ” दिल्यानंतर या लेडी भाईची कुजबुज त्यांच्याही कानावर आली. चौकशीत तिचे धाडस कमी झाले आणि अखेर तिने लेखी माफीनामा सादर केला. मात्र तिच्या कारनाम्यांनी नाशिकच्या गुन्हेगारी विश्वात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या लेडी भाईवर पुन्हा कारवाई होईल का? की तिच्या ओळखीमुळे ती जाळ्यातून पुन्हा सुटेल? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.