Nashik News | शिक्षकास पोलिसांकडून नाहक मारहाण

'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची कारवाई
Nashik News
पोलिसांनी मारहाण केल्याने रमेश कवडे यांच्या पायावर उमटलेले व्रण.pudhari photo

नाशिक : सिन्नर फाटा येथे पानटपरीसमोर उभे असताना नाशिकरोड पोलिसांनी नाहक मारहाण करीत 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची कारवाई केली. मात्र, प्रत्यक्षात वाहन चालवता येत नसतानाही पाेलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप शिक्षकाने केला आहे. यासंदर्भात रमेश कवडे या शिक्षकाने परिमंडळ दोनच्या उपआयुक्त मोनिका राऊत यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

कवडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ३० जुनला रात्री नऊच्या सुमारास ते त्यांचे शालक जालिंदर उगले यांच्यासह दुचाकीवरून सिन्नर फाटा येथील टपरीवर पानसुपारी घेण्यासाठी गेले. त्यावेळी नाशिकरोड पोलिस ठाण्याचे दोन अंमलदार त्याठिकाणी आले. त्यांनी कवडे यांना काठीने मारहाण करीत नाशिकरोड पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर कवडे व उगले यांना पोलिस ठाण्यात दोन तास बसवून ठेवत मद्यसेवन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई केली. मात्र, कवडे यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांना वाहन चालवता येत नाही. त्यांचे शालक उगले हे दुचाकी चालवत होते. तसेच ते मद्यसेवन करत नाही. त्यामुळे नाशिकरोड पोलिसांनी नाहक मारहाण करीत चुकीची कारवाई केल्याचा आरोप कवडे यांनी निवेदनात केला आहे. संबंधित घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून ते फुटेज कवडे यांनी पोलिसांना दिले आहे. त्यामुळे कवडे यांनी संबंधित पोलिस अंमलदारांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. संबंधित अंमलदारांनी चुकीची कारवाई केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news