

नांदगाव : मुसळधार पावसामुळे बाभळीच्या झाडाखाली आसरा घेतलेल्या बाप-लेकाला भरधाव एसटी बसने धडक दिली. यामध्ये बापाचा जागीच मृत्यू झाला तर १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय पोपट डांगे (वय ४०, रा दहेगाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना नांदगाव-येवला मार्गावर हनुमानपाटी परिसरात रविवारी (दि.२८) सायंकाळी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे दहेगाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दहेगाव येथील युवा शेतकरी संजय डांगे हे आपला मुलगा कृष्णा डांगे (वय १४) याच्यासह भारम कोळम येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभाहून दुचाकीवरून गावी परतत होते. सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दोघांनी हनुमानपाटी परिसरात रस्त्याकडेला असलेल्या बाभळीच्या झाडाखाली आसरा घेतला. त्याचवेळी येवला येथून नांदगावकडे जाणारी नांदगाव-पुणे एसटी बस (MH- ४१ X- ८७६९) चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला घसरली. अनियंत्रित बस थेट झाडाखाली उभ्या असलेल्या बाप-लेकाच्या अंगावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की संजय डांगे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या कृष्णाला तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी. ए. अलगट पुढील तपास करत आहेत.