

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानाची मुदत संपुष्टात आल्याने गाशा गुंडाळण्याची वेळ येऊन ठेपलेल्या स्मार्ट सिटी कंपनीने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आधार घेत कारभार पुढे हाकण्यासाठी सल्लागार संस्थेची भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मार्ट सिटीच्या व्याप्तीबाहेरील कामे मिळविण्यासाठी तसेच महापालिकेसह पोलिस, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्तालयांतील विविध प्रकल्पांसाठी सल्लागार संस्था म्हणून काम करण्यासाठी कंपनी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलविली होती.
स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात २०१६ मध्ये नाशिकची निवड केली गेली. स्मार्ट प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीची स्थापन केली गेली. या कंपनीमार्फत ५२ प्रकल्प हाती घेण्यात आले. यापैकी २० प्रकल्प प्रत्यक्ष कंपनीने, तर उर्वरित सीएसआर निधीतून पूर्ण करण्यात आले. गत ३१ मार्च रोजी स्मार्ट सिटी कंपनीची मुदत संपुष्टात आली. त्यामुळे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नवीन कामे घेऊ नयेत, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कंपनीने आता आपल्याकडील प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गाशा गुंडाळावा लागेल अशी परिस्थिती असताना आता सिंहस्थ कुंभमेळा स्मार्ट कंपनीच्या मदतीसाठी धावून आला आहे. स्मार्ट सिटीच्या व्याप्तीबाहेरील प्रकल्प हाती घेण्याची तसेच सल्लागार संस्था म्हणून काम करण्यासंदर्भात कंपनी कायद्यामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह गर्दी नियंत्रणासाठी तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. ही जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तूर्त स्मार्ट सिटी कंपनीला दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या गरजेनुसार कॅमेरे बसून कंट्रोल कमांड सेंटरशी जोडले जाणार आहेत.
स्मार्ट सिटी कंपनीची मुदत संपुष्टात आली आहे. आगामी कुंभमेळा तसेच विशेष प्रकल्पांचे कामे करण्यासाठी कंपनी कायद्यामध्ये बदल केला जात आहे. त्यामुळे कंपनी स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय संस्थांच्या कामांसाठी पात्र ठरेल.
सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी, नाशिक