

देवळा (नाशिक) : देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीतील अकरा सदस्यांपैकी सहा सदस्यांनी राजीनामे दिल्याने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 145(1-अ) नुसार ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा आदेश दिला आहे. आता या ग्रामपंचायतीवर तात्काळ प्रशासकाची नेमणूक होणार आहे.
सदस्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा
ग्रामपंचायत महालपाटणेची निवडणूक 9 फेब्रुवारी 2021 रोजी झाली होती. त्यात 11 सदस्य निवडून आले होते. त्यापैकी गणेश बच्छाव, किरण आहिरे, काजल खरोले, निर्मला आहिरे, सुमनबाई आहिरे आणि योगेश आहिरे या सहा सदस्यांनी सरपंच आणि उर्वरित सदस्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून 11 एप्रिल 2025 रोजी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले होते.
हे राजीनामे 16 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत पडताळून मंजूर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीतील सहा जागा रिक्त झाल्या.
उर्वरित सरपंच सुरेखा ठाकरे, उपसरपंच तुषार कुलकर्णी, सदस्य बाळू खरोले, राधाबाई गांगुर्डे आणि प्रियंका देवरे हे पाच सदस्य कार्यरत राहिले. रिक्त पदांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला. या प्रकरणात विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावण्या झाल्यानंतर अखेर 17 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लवकरच विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक होणार आहे.
महालपाटणे गावात अनेक विकासकामे झाली आहेत. विरोधकांना विकासापेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटले, म्हणून त्यांनी राजीनामे दिले. आम्ही विकासावर भर दिल्याने जनता आमच्यासोबत आहे. येणाऱ्या काळात विरोधकांना याची जाणीव होईल.
सुरेखा ठाकरे , सरपंच, महालपाटणे गाव, ता. देवळा, जि. नाशिक