

कळवण : तालुक्यातील निवाणे गावात गुरुवारी (दि. २) सुलतानी कर्जवसुलीचा प्रकार घडला. फायनान्स बॅंकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदार मजुरावर तलवारीने प्राणघातक हल्ला करीत जखमी केले. दरम्यान, स्थानिकांनी या मद्यधुंद संशयितांना चोप देत कळवण पोलिसांच्या स्वाधीन केले.
जखमी शेतमजूर किसन बोरसे याच्या तक्रारीनुसार, त्याच्या आईने आयडीएफसी फायनान्स बँकेच्या देवळा शाखेतून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दोन वर्षे नियमित कर्जाचे हफ्ते भरले, काही कारणास्तव मागील महिन्याचा हप्ता भरला गेला नव्हता. त्याच्या वसुलीसाठी गुरुवारी बँकेचा वसुली कर्मचारी बाळासाहेब उत्तम पाथरे (रा. वायगाव, ता. बागलाण), भाऊ शरद पाथरे (रा. नाशिक) आणि साथीदार मंगेश साहेबराव आहिरे हे बोरसेकडे आले. त्यांना दुपारी 3 च्या सुमारास पैसे देण्यास सांगितले. तेव्हा माघारी आलेले तिघे मद्यपान करून 3 पूर्वीच बोरसेच्या घरी धडकले. पैशांची तजवीज होतेय, अशी विनवणी केली असता त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्वरित पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत सोबत आणलेल्या कार (एमएच १५, जेएम 9383) मधून शरद पाथरेने तलवार काढत बोरसेच्या डोक्याला तसेच पाठीवर वार केले. त्यातून उडालेला गोंधळ पाहून स्थानिक धावून आले. त्यांनी हल्लेखोरांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
जखमी किसनवर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संशयित पाथरे बंधू आणि आहिरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोळंके अधिक तपास करीत आहेत.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटकडून होत असलेल्या दादागिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कळवण तालुक्यात फायनान्स कंपन्यांनी महिलांचा गट तयार करून त्यांना कमी व्याजाचे आमिष दाखवून कर्ज देत आहेत. मात्र, सुलतानी व्याजाच्या फंदात अडकून अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या कंपन्यांवर शासनाने निर्बंध घालावे, अशी मागणी केली जात आहे.