

पंचवटी (नाशिक): नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला केवळ लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधानंतर संचालक मंडळाने माघार घेत शेतकऱ्यांच्या मागणीला प्राधान्य दिले. त्यानुसार शेतकरी आणि भरेकरी यांच्यासाठी स्वतंत्र विक्री जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिंडोरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड या तालुक्यातील शेतकरी किरकोळ कृषी माल विक्रीसाठी आणतात, त्यातील बहुतांश शेतकरी लिलावात सहभागी न होता, आपला माल किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विक्री करतात. मात्र, शेतकऱ्यांच्या नावाखाली भरेकरी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत असल्याने बाजार समितीचे नुकसान होत असल्याचे संचालक मंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे किरकोळ भाजीपाला बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, काही शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या निर्णयाला विरोध केल्याने शेतकरी आणि भरेकरी यांच्या भाजीपाला विक्रीच्या वेगवेगळ्या जागा निश्चित करत या विषयावर पडदा टाकण्यात आला आहे.
बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी आहे, त्यांच्या नावाखाली भरेकरी व्यवसाय करीत असल्याने हा निर्णय घेतला होता. मात्र, शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता हा व्यवहार पूर्ववत सुरू ठेवणार आहोत. त्यासाठी शेतकरी आणि भरेकरी यांची भाजीपाला विक्रीची स्वतंत्र ठिकाणे निश्चित केली.
कल्पना चुंभळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक.
समितीमध्ये लिलावात सहभाग घेतल्यानंतर भाजीपाल्याला दर मिळत नाही. किरकोळमध्ये विक्री केल्यास दोन पैसे अधिक मिळतात. त्यामुळे बाजार समितीने भाजीपाल्याचे किरकोळ विक्री ही सुरूच ठेवावी.
नामदेव बोडके, शेतकरी, नाशिक.